
राष्ट्रीय स्वंय संघाचा शताब्दी सोहळा यावर्षी साजरा होत आहे. त्यानिमित्त दिल्लीत 4 ते 6 जुलै दरम्यान संघाच्या प्रांत प्रचारकांची बैठक झाली आहे. या बैठकीत शताब्दी सोहळा कसा साजरा करायचा याचीही रुपरेषा ठरवण्यात आली आहे. याची माहीती अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. देशात सध्या संघ रचनेनुसार 58964 मंडल, 44055 वस्ती आहेत. यात हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच समाजात सद्भाव-समरसतेला प्रोत्साहन देण्यासाठी 11360 खंड वा नगरात सामाजिक सद् भाव बैठकांचे आयोजन होणार आहे. एका प्रश्नाला उत्तर देताना सुनील आंबेकर म्हणाले की भारताच्या सर्वच भाषा राष्ट्रभाषा आहेत आणि संघ मानतो की प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच झाले पाहीजे…
दिल्लीतील केशव कुंज येथे आयोजित पत्रकार परिषदेत सुनील आंबेकर पुढे म्हणाले की संघाच्या रचनेनुसार देशातील 924 जिल्ह्यात प्रमुख नागरिक चर्चासत्रांचे आयोजन केले जाईल. समूह, व्यवसाय, वर्गानुसार आयोजित चर्चासत्रात भारताचे विचार, भारताचा गौरव आणि भारताच्या स्व आदी विषयांवर चर्चा होईल.
ते पुढे म्हणाले की मोठ्या प्रमाणात घरोघरी जाऊन गाव, वस्तीत प्रत्येक घरात पोहचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शताब्दी वर्षाच्या साऱ्या कार्यक्रमाचा उद्देश्य व्यापक संपर्क वाढवणे हाच आहे. भौगोलिक, सामाजिक दृष्टीने समाजाच्या सर्व वर्गापर्यंत जाणे, आणि सर्व कार्यक्रमात त्यांच्या सहभाग करुन घेतला जाणार आहे.ही मोहिम एक प्रकारे सर्वसमावेशी, सर्वस्पर्शी असणार आहे. विजयादशमीपासून हा शताब्दी सोहळ्याची सुरुवात होणार आहे. देशभरात आयोजित विजयादशमीच्या उत्सवात सर्व स्वयंसेवक सहभागी असतील.
ते म्हणाले की, देश आर्थिक आणि तांत्रिक प्रगती करीत पुढे जात आहे. परंतु केवळ आर्थिक किंवा तांत्रिक प्रगती करणे पुरेसे नाही. आपल्या समाजाच्या वैशिष्ट्यांसह, राष्ट्राच्या स्वतःच्या विशेष गुणांसह, आपण समाजातील सर्व लोकांसाठी चिंता, पर्यावरणाची चिंता, कुटुंबातील जीवनमूल्यांचे संरक्षण, सामाजिक जीवनात परस्पर सुसंवाद राखणे हे विषय समाजापर्यंत पोहोचवू. शताब्दी वर्षाच्या सर्व कार्यक्रमांमधून आपण हा संदेश समाजापर्यंत पोहोचवू. जर समाजाने याचा विचार केला आणि त्यात सहभागी झाला तर आपली प्रगती एकतर्फी राहणार नाही आणि ती सर्वसमावेशक असेल, ती सर्वांना सोबत घेऊन पुढे जाईल असेही ते म्हणाले.
आंबेकर पुढे म्हणाले की तीन दिवसीय प्रांत प्रचारक बैठकीत संघ कार्य विस्तार, शताब्दी वर्ष योजना,विविध प्रांतात चाललेले कार्य, अनुभव आणि प्रयत्नांची देखील चर्चा झाली. तसेच समाज जीवनाच्या विभिन्न समसामायिक विषयांसंदर्भात देखील चर्चा झाली. बैठकीत मणिपूर येथील वर्तमान स्थिती, स्वयंसेवकांद्वारा केले जाणारे कार्य आणि सामाजिक सद्भावसाठी केले जाणारे प्रयत्न या संदर्भातही चर्चा झाली.स्वयंसेवकांद्वारा केलेल्या प्रयत्नांचे सकारात्मक परिणामही पाहायला मिळालेत. स्वयंसेवक दोन्ही पक्षांशी बोलत आहेत. सीमाभागातून आलेल्या कार्यकर्त्यांनी तेथील कार्याची स्थिती आणि अनुभव सांगितले आहेत. संघ कार्यकर्ता समाजासोबत मिळून स्थानिक लोकांना संघटीत करणे आणि त्यांच्या अडचणी दूर करणे यासाठी निरंतर कार्य करत आहेत.
सुनील आंबेकर यांनी सांगितले की एप्रिल ते जूनपर्यंत देशभरात 100 प्रशिक्षण वर्गांचे आयोजन केले होते, 40 वर्षांहून कमी वयाच्या स्वयंसेवकांसाठी आयोजित 75 वर्गांत 17,609 स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात आले. या प्रकारे 40 से 60 वर्ष वयोगटासाठी आयोजित 25 वर्गांमध्ये 4,270 प्रशिक्षणार्थींनी भाग घेतला. या प्रशिक्षण वर्गांत देशाच्या 8812 ठिकाणांहून स्वयंसेवकांनी सहभाग घेतला.
एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की लालूच, जबरदस्ती, मजबूरीचा लाभ उठवून आणि कट रचून धर्मांतर करणे चुकीचे आहे. अन्य एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की भारताच्या सर्वच भाषा राष्ट्रभाषा आहेत आणि संघ मानतो की प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच झाले पाहीजे. या प्रसंगी डॉ. अनिल अग्रवाल, अखिल भारतीय सह प्रचार प्रमुख नरेंद्र ठाकुर आणि प्रदीप जोशी उपस्थित होते.