खूप चांगलं असणंही खूप धोकादायक, उच्च न्यायालयाची त्या प्रकरणात टिप्पणी, याचिकाही फेटाळली!
अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका प्रकरणात केलेल्या टिप्पणीची चांगलीच चर्चा होत आहे. कधी कधी खूप चांगले असेही धोकादायक ठरू शकते, असे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे.

Allahabad High Court : अलाहाबाद उच्च न्यायालयाने ‘कधीकधी खूप चांगलं होणं खूप धोकादायक असतं’ अशी टिप्पणी केली आहे. उत्तर प्रदेशमधील रामपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार मोहीबुल्लाह यांना दिलासा देताना न्यायालयाने हे मत व्यक्त केलंय. 2024 साली मोहीबुल्लाह यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. 2024 सालच्या लोकसभा निवडणुकीत रामपूर मतदासंघातून घनश्याम सिंह लोधी यांनीही निवडणूक लढवली होती. त्यांनी समाजवादी पार्टीचे मोहीबुल्लाह यांच्या निवडीवर आक्षेप व्यक्त करत ही याचिका दाखल केली होती.
न्यायालयाने याचिका फेटाळली, विशेष टिप्पणीची चर्चा
अलाहाबाद उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत मोहीबुल्लाह यांची खासदार म्हणून निवड वैध असल्याचा निर्वाळा दिला. दाखल याचिकेत निवडीवर आक्षेप घ्यावा असा कोणताही स्पष्ट आधार देण्यात आलेला नाही. त्यामुळे हे प्रकरण सुनावणी योग्य नाही, असे मत यावेळी अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केले. तसेच न्यायालयाने ही याचिका फेटाळतान विशेष टिप्पणी केली आहे.
जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्या काही ओळींचा उल्लेख
ही टिप्पणी करताना न्यायालयाने केटी अरवंदम विरुद्ध टी सत्यपाल या प्रकरणातील निकालाचा संदर्भ दिला. न्यायालयीन प्रक्रियेचा पुन्हा पुन्हा दुरुपयोग केला जात आहे, अशी टिप्पणी न्यायालयाने व्यक्त केली. कायद्याच्या उदार धोरणाचा दुरुपयोग करू नये, असे सांगताना न्यायालयाने नोबेल पारितोषक विजेते आणि प्रसिद्ध साहित्यिक, नाटककार जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्या काही ओळींचा उल्लेख केला. महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर ‘खूप जास्त चांगले असेणेही खूप धोकादायक असते’ असे मत शॉ यांनी व्यक्त केले. याच वाक्याचा न्यायालायने उल्लेख करत न्यायालयाच्या उदार धोरणाचा दुरुपयोग करू नये, अशी टिप्पणी केली.
प्रकरण काय होते?
घनश्याम सिंह लोधी यांनी 2024 सालची लोकसभा निवडणूक भाजपाच्या तिकिटावर लढवली होती. रामपूर मतदारसंघातून ते निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. त्यांच्याविरोधात समाजवादी पक्षाचे नेते मोहिबुल्लाह यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत मोहिबुल्लाह यांचा विजय झाला होता. दरम्यान, या निवडणुकीत मोहिबुल्लाह यांनी लोकप्रतिनिधी कायदा 1951 च्या कलम 123(7) चा भंग केला आहे. उमेदवारी अर्ज चुकीच्या पद्धतीने भरला होता, असा आरोप करण्यात आला होता. याच प्रकरणातील याचिका न्यायालयाने फेटाळून लावली.