महिलांचे लैंगिक छळ केल्याचा आरोप, खासदार प्रज्वल रेवन्ना यांना पोलीस कोठडी

खासदार प्रज्वल रेवन्ना यांना पोलिसांनी काल जर्मनीहून बंगळुरुला दाखल झाल्यानंतर अटक केली आहे. कोर्टाने त्यांना ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्यावर महिलांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे.

महिलांचे लैंगिक छळ केल्याचा आरोप, खासदार प्रज्वल रेवन्ना यांना पोलीस कोठडी
| Updated on: May 31, 2024 | 6:17 PM

जनता दल-सेक्युलरचे निलंबित खासदार प्रज्वल रेवन्ना यांना बंगळुरू न्यायालयाने झटका दिला आहे. प्रज्वल रेवन्ना यांना ६ जूनपर्यंत एसआयटी कोठडी सुनावली आहे. प्रज्वल यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप आहे. यासाठी एक विशेष तपास पथक नेमलं गेलं असून तेच या प्रकरणाची चौकशी करत आहेत. वैद्यकीय तपासणीनंतर एसआयटीने प्रज्वलला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रज्वल रेवन्ना कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जर्मनीला पळून गेले होते. त्यानंतर ते गुरुवारी रात्री बंगळुरूला येताच एसआयटीने त्यांना अटक केली.

प्रज्वल रेवन्ना हे जेडीएसचे प्रमुख आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे नातू आहेत. तसेच ते हसन लोकसभा मतदारसंघातून निवडणूक देखील लढवत आहेत. प्रज्वल रेवन्ना यांच्यावर महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. त्याच्यावर आतापर्यंत लैंगिक छळाचे ३ गुन्हे दाखल आहेत. प्रज्वल लोकसभा निवडणुकीसाठी त्यांच्या मतदारसंघात मतदान झाल्यानंतर 27 एप्रिल रोजी जर्मनीला पळून गेले होते.

प्रज्वल रेवन्ना गुरुवारी रात्री उशिरा बंगळुरू विमानतळावर उतरले. विमान तळावरुनच त्यांनी पोलिसांनी अटक केली. महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील महिला पोलिसांचे पथक त्यांच्याविरुद्ध जारी केलेल्या अटक वॉरंटची अंमलबजावणी करण्यासाठी त्याची वाट पाहत होते.

कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वरा यांनी शुक्रवारी सांगितले की, महिलांच्या लैंगिक छळाच्या आरोपांचा सामना करत असलेल्या प्रज्वल रेवन्ना याला प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अटक करण्यात आली असून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू राहील.

प्रज्वल रेवन्ना यांच्या वकिलाने शुक्रवारी सांगितले की, खासदार प्रज्वल यांच्या विरोधात तपास करत असलेल्या एसआयटीला ते पूर्ण सहकार्य करत आहेत.’ या प्रकरणी मीडिया ट्रायल न करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. या अटकेमुळे हसनचे खासदार प्रज्वल यांच्यावरील खटल्यांचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाला मदत होईल, असे परमेश्वरा म्हणाले.