
पहलगामच्या बैसरन घाटीमध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी 22 एप्रिल रोजी 26 भारतीय नागरिकांची हत्या केली. या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या तिन्ही दहशतवाद्यांचा भारतीय सैन्य दल आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी खात्मा केला आहे. ऑपरेशन सिंदूरवर आज संसदेत सलग दुसऱ्यादिवशी चर्चा सुरु आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज ऑपरेशन महादेवबद्दल संसदेत महत्त्वाची माहिती दिली. पहलगामच्या दहशतवाद्यांना संपवण्यासाठी ऑपरेशन महादेव कधी सुरु झालं?. दहशतवाद्यांची ओळख कशी पटवली? याची सगळी इनसाइड स्टोरी अमित शाह यांनी संसदेत सांगितली.
“मुसा सुलेमान, अफगाणि आणि जिब्रान अशी या तीन दहशतवाद्यांची नाव आहेत. तिघेही ए श्रेणी लष्कर-ए-तयबाचे कमांडर होते. भारतीय सैन्य, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्त ऑपरेशन राबवून या दहशतवाद्यांचा खात्मा केला” असं अमित शाह म्हणाले. “ऑपरेशन महादेवची सुरुवात 22 मे 2025 रोजी झाली. ज्या दिवशी हल्ला झाला, त्या दिवशी रात्री एक सुरक्षा बैठक झाली” असं अमित शाह यांनी सांगितलं. “हे म्हणतात जम्मू-काश्मीरला राहुल गांधींशिवाय कोणी गेलं नाही. हे कुठल्या चष्म्यातून पाहतात ते माहित नाही. 1 वाजता हल्ला झाला. मी 5.30 वाजता श्रीनगरमध्ये उतरलो” असं अमित शाह म्हणाले.
IB ला पहिला ह्यूमन इंटेलिजन्स कधी मिळाला?
“23 एप्रिलला सुरक्षेसंदर्भात एक महत्त्वाची बैठक झाली. त्यात भारतीय सैन्य, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे अधिकारी उपस्थित होते. हे नृशंस हत्याकांड करणारे दहशतवादी देशाबाहेर पळू शकणार नाहीत अशी व्यवस्था आम्ही केली” असं अमित शाह म्हणाले. “22 मे रोजी IB ला एक ह्यूमन इंटेलिजन्स प्राप्त झाला. राची गाव क्षेत्रात दहशतवादी असल्याची माहिती मिळाली. आयबी आणि सैन्याने राची क्षेत्रात अलटास सिग्नल कॅप्चर करण्यासाठी जी उपकरणं आपल्या एजन्सीने बनवली आहेत, त्या द्वारे पुष्टी केली” असं अमित शाह म्हणाले.
दहशतवाद्यांना संपवण्यासाठी दोन महिने का लावले?
“22 मे ते 22 जुलैपर्यंत दहशतवाद्यांविषयी अचूक माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरु होते. थंड उंचावर सैन्याचे अधिकारी असायचे. सिग्नल इंटरसेप्ट करण्यासाठी कधी पायी चालत फिरायचे. 22 जुलैला यश मिळालं. सेन्सरच्या माध्यमातून दहशतवादी असल्याची पुष्टी झाली. 4 पॅराच्या नेतृत्वाखाली सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी एकत्र येऊन दहशतवाद्यांना घेरलं व काल जे ऑपरेशन झालं, त्यात निर्दोष नागरिकांना मारणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा झाला” असं अमित शाह म्हणाले.
NIA ने काय केलेलं?
“NIA ने या दहशतवाद्यांना आसरा देणारे, जेवण पोहोचवणाऱ्यांना आधीच ताब्यात घेतलं होतं. या दहशतवाद्यांना मारल्यानंतर त्यांचे मृतदेह श्रीनगरला आणण्यात आले. त्यांना आसरा देणाऱ्यांकडून या दहशतवाद्यांची ओळख पटवून घेण्यात आली. इतकच नाही, आम्ही एवढ्यावरच विश्वास ठेवला नाही, दहशतवादी हल्ल्याच्या ठिकाणी जी काडतूसं मिळालेली, त्याचा FSL रिपोर्ट बनवलेला. या दहशतवाद्यांकडे M 9 आणि AK 47 रायफल्स होती. या रायफल्स रात्री विमानाने 12 वाजता चंदीगडला पाठवल्या. तिथे एका खास पद्धतीने या रायफल्स याच दहशतवाद्यांच्या असल्याच्या ओळख पटवली” असं अमित शाह म्हणाले.