जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर अमित शाहांचं मोठं विधान, ते गुपित आलं समोर

जगदीप धनखड यांच्या अचानक राजीनाम्यावरून निर्माण झालेल्या वादावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी धनखड यांच्या आरोग्याच्या समस्या राजीनाम्यामागील कारण असल्याचे सांगितले. विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या शंकांना शाह यांनी फेटाळून लावले.

जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर अमित शाहांचं मोठं विधान, ते गुपित आलं समोर
| Updated on: Aug 25, 2025 | 4:12 PM

जगदीप धनखड यांनी २१ जुलै रोजी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. भारताचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा दिल्याने चर्चांना उधाण आले होते. त्यांच्या राजीनाम्यानंतर मोठा राजकीय गोंधळ निर्माण झाला होता. विरोधकांनी या राजीनाम्यामागे इतर काही कारणे असल्याचा आरोप केला होता. आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अखेर मौन सोडले आहे. जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला, त्या मागचे कारण काय, याबद्दल सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे.

अमित शाह यांनी नुकतंच एएनआयला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना जगदीप धनखड यांच्या अचानक राजीनामा देण्याबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर अमित शाहांनी खरे कारण सांगितले. जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचे कारण त्यांच्या आरोग्याच्या समस्या असल्याचे अमित शाह यांनी स्पष्ट केले आहे. जगदीप धनखड यांनी केवळ त्यांच्या वैयक्तिक आरोग्याच्या कारणांमुळे राजीनामा दिला आहे. या प्रकरणावरून कोणीही राजकारण करू नये.” असे अमित शाह म्हणाले.

अमित शाह काय म्हणाले?

“खरं काय आणि खोटं काय ही व्याख्या कदाचित विरोधक काय बोलत यावरुन तुम्ही बनवलेली आहे. यात उगाचच पराचा कावळा बनवू नये. जगदीप धनखड हे संवैधानिक पदावर होते आणि त्यांच्या कार्यकाळात त्यांनी संविधानानुसार चांगले काम केले. त्यांच्या वैयक्तिक आरोग्याच्या समस्येमुळे त्यांनी राजीनामा दिला आहे. कोणीही जास्त ताणून त्यात काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करू नये. देशात अनेक घटना घडतात, प्रत्येक घटनेमध्ये अशाप्रकारे राजकारण करणे योग्य नाही”, असे अमित शाह म्हणाले.

विरोधक आक्रमक

दरम्यान जगदीप धनखड यांनी २१ जुलै रोजी पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर दिवसभर संसदेच्या कामकाजात भाग घेतला होता. मात्र त्याच संध्याकाळी त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन राजीनामा सादर केला. या राजीनाम्यामध्ये त्यांनी आरोग्याच्या समस्या आणि डॉक्टरांचा सल्ला ही कारणे दिली होती. तरीही काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी तो एक सामान्य राजीनामा मानण्यास नकार दिला होता. आता अमित शाह यांच्या स्पष्टीकरणामुळे या चर्चेवर पडदा पडण्याची शक्यता आहे.