नाकाबंदी, छापेमारी करून 8 राज्यांचे पोलीस थकले, अखेर अमृतपाल याच्या मुसक्या आवळल्या; ‘या’ ठिकाणी सापडला

अजनाला कांडानंतर गायब झालेल्या अमृतपाल सिंग याला अखेर पंजाबच्या मोगा पोलिसांनी अटक केली आहे. येथील एका गुरुद्वारातून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे आहेत.

नाकाबंदी, छापेमारी करून 8 राज्यांचे पोलीस थकले, अखेर अमृतपाल याच्या मुसक्या आवळल्या; या ठिकाणी सापडला
Amritpal Singh
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 23, 2023 | 9:09 AM

चंदीगड : खालिस्तान समर्थक फरार अमृतपाल अखेर पोलिसांच्या जाळ्यात आला आहे. तब्बल 36 दिवसानंतर पोलिसांनी त्याला मोगातील रोडे गावातील एका गुरुद्वारातून अटक केली आहे. पंजाबच्या मोगा पोलिसांनी ही कारवाई केली. अमृतपाल सिंग हा अजनाला कांडानंतर गायब होता. त्याला पकडण्यासाटी आठ राज्याच्या पोलिसांनी प्रचंड मेहनत घेतली होती. सातत्याने वाहनांची चेकींग, नाकाबंदी, छापेमारी आणि पेट्रोलिंग करूनही तो पोलिसांच्या हाती येत नव्हता. त्याचा शोध घेताना पोलीस अक्षरश: थकून गेले होते. मात्र नंतर त्याला पोलिसांनी पकडलेच.

अमृतपाल सिंगला अटक केल्याचं पंजाब पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. अमृतपाल सिंगने मोगा पोलिसांसमोर शरणागती पत्करल्याचं आधी सांगितलं जात होतं. मात्र, पंजाब पोलिसांनी ट्विट करून त्याला अटक केल्याचं जाहीर केलं. त्याला मोगा येथील रोडेवाल गुरुद्वारातून अटक केली आहे. त्याला पोलीस अमृतसरला घेऊन गेले आहेत. आता त्याला थेट आसामच्या डिब्रुगड तुरुंगात टाकण्यात येणार आहे.

काय आहे ट्विट?

पंजाब पोलिसांनी ट्विट करून या कारवाईची माहिती दिली आहे. अमृतपाल सिंगला पंजाबमधील मोगा येथून अटक करण्यात आली आहे. पंजाब पोलीस पुढील माहिजी आहे. लोकांनी शांतता राखावी. कायदा आणि सुव्यवस्था चांगली राहण्यास मदत करावी. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. अफवा पसरवू नये, असं ट्विट पंजाब पोलिसांनी केलं आहे.

नेपाळ पोलीसही अलर्ट

आसामच्या डिब्रुगड तुरुंगात त्याला पाठवण्यात येणार आहे. या ठिकाणी त्याचे अनेक साथीदार आहेत. कारवाईत अडथळा टाकणे. चिथावणी देते आदी गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. 18 मार्चपासून तो फरार होता. त्याला अटक करण्यासाठी पोलिसांनी अनेक राज्यांमध्ये अलर्ट जारी केला होता. एवढेच नव्हे तर नेपाळ पोलिसांनीही त्याला आपल्या सर्व्हिलान्स यादीत ठेवलं होतं. नेपाळच्या मार्गे पाकिस्तानात पळून जाण्याच्या तयारीत अमृतपाल असल्याचं सांगितलं जात होतं. त्यामुळे नेपाळ पोलीसही अलर्ट झाले होते.

 

एक दिवस आधीच मोगात गेला होता

अमृतपाल सिंग एक दिवस आधीच मोगा येथे गेल्याचं सांगितलं जात होतं. येथील एका गुरुद्वारात तो लपला होता. 10 एप्रिल रोजी त्याचा साथीदार पप्पलप्रीत सिंग याला अटक करण्यात आली होती. अमृतपाल आणि पप्पलप्रीत सोबतच फरार झाले होते. पप्पलप्रीतला सध्या आसामच्या तुरुंगात ठेवलं आहे.