
जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये मंगळवारी मोठा दहशतवादी हल्ला झाला, या दुर्दैवी घटनेत 26 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट आहे. दरम्यान या दहशतवादी हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्या व्हिडीओमध्ये दहशतवादी निष्पाप लोकांवर गोळीबार करताना दिसत आहेत. दहशतवाद्यांच्या हातात अॅटोमॅटिक गन आहेत, ते पहलगाममध्ये आलेल्या पर्यटकांवर गोळीबार करत आहेत.या व्हिडीओमध्ये गोळीबाराचा आवाज देखील ऐकू येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे दहशतवादी पाकिस्तानी असून त्यांनी आपल्या काही साथिदारांसह पाक व्याप्त काश्मीरमधून भारतात प्रवेश केला.त्यांच्यासोबत असलेला एक दहशतवादी चकमकीमध्ये मारला गेला आहे.
या व्हिडीओमध्ये हल्ल्यापूर्वी हे दहशतवादी झाडावर चढताना दिसत आहेत. त्यानंतर त्यांनी अचानक तिथे आलेल्या लोकांवर गोळीबार केला. या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यामध्ये काही स्थानिक लोकांचा हात असल्याचा देखील संशय व्यक्त केला जात आहे. या दहशतवाद्यांनी हल्ल्यापूर्वी या परिसराची रेकी केल्याची माहिती देखील समोर आली आहे. पोलिसांच्या वेशात आलेल्या या दहशतवाद्यांनी आधी मुलं आणि स्त्रीयांना बाजुला केलं, त्यानंतर पुरुषांवर गोळीबार केला, काही लोकांवर जवळून गोळीबार केला, तर काही लोकांवर दुरून गोळीबार करण्यात आला. दहशतवाद्यांनी या घटनेचा व्हिडीओ देखील बनवला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगामचीच निवड केली कारण जेव्हा हल्ला झाला तेव्हा इथे सुरक्षा दलाचे जवान तैनात नव्हते. हल्ला झाल्यानंतर बचाव कार्यासाठी देखील वेळ लागणार होता. तोपर्यंत त्यांना पळून जाण्यासाठी वेळ मिळाला. दरम्यान या हल्ल्यानंतर आता सुरक्षा दलानं जम्मू -काश्मीरमध्ये मोठी कारवाई केली आहे, या दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. आतापर्यंत तब्बल दीड हजार लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. भारतानं या हल्ल्यानंतर पाकिस्तानवर मोठी कारवाई केली असून, पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. सिंधु पाणी वाटप कराराला स्थगिती देण्यात आली आहे.