
नवीन वर्षाच्या सुरुवातीला भारताला निसर्गाच्या कोपाचा सामना करावा लागला आहे. त्यातच आज पहाटे आसाम आणि आसपासच्या राज्यांमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के बसले आहेत. साधारण ५.१ रिश्टर स्केल तीव्रतेच्या या भूकंपामुळे आसाममधील मोरीगावसह गुवाहाटी आणि मेघालयातील शिलॉन्गपर्यंतची धरती हादरली. पहाटेची वेळ असल्याने आणि धक्के तीव्र असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजी (NCS) ने दिलेल्या माहितीनुसार, आसाममध्ये आलेल्या भूकंपाची वेळ पहाटे ४ वाजून १७ मिनिटे अशी नोंदवण्यात आली आहे. या भूकंपाचे केंद्र आसामच्या मोरीगाव जिल्ह्यात जमिनीखाली ५० किलोमीटर खोलीवर होते. या भूंकपाची तीव्रता ५.१ रिश्टर स्केल इतकी असून यामुळे अनेक घरांना तडे गेल्याचेबोललं जात आहे. हा भूकंप होण्याच्या काही मिनिटे आधी म्हणजेच पहाटे ३:३३ वाजता त्रिपुराच्या गोमती जिल्ह्यात ३.९ तीव्रतेचा भूकंप झाला होता. एकाच पहाटे दोन राज्यांमध्ये झालेल्या या हालचालींमुळे भूगर्भशास्त्रज्ञांकडून चिंता व्यक्त केली आहे.
हा भूकंप झाला तेव्हा पहाटेची वेळ होती. अनेक नागरिक गाढ झोपेत होते. अचानक पलंग हलणे, भांडी पडणे आणि खिडक्यांच्या काचांचा आवाज आल्याने लोक घाबरून जागे झाले. आसाम आणि मेघालयामध्ये सध्या कडाक्याची थंडी पडली आहे. मात्र भूकंप झाल्याने जीव वाचवण्यासाठी लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण घराबाहेर मोकळ्या जागेत धावत आले. गुवाहाटी आणि मोरीगावमधील अनेक रहिवासी सोसायट्यांमध्ये लोक पहाटे ६ वाजेपर्यंत घराबाहेरच थांबून होते.
#WATCH Footage from Assam showing the earthquake that struck early this morning at approximately 4:17 a.m. IST.
Video shared by #mahiiinnx#Earthquake #Assam #India #NorthEastIndia pic.twitter.com/MH6i8FxUzc— Naga Hills (@Hillsnaga) January 5, 2026
ईशान्य भारत हा भूकंपाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानला जातो. विशेष म्हणजे गेल्या पाच दिवसांत आसाममध्ये भूकंप होण्याची ही दुसरी वेळ आहे. साधारण ३१ डिसेंबर २०२५ ला डिमा हसाओ जिल्ह्यात ३.४ तीव्रतेचा भूकंप आला होता. तर ५ जानेवारी २०२६ रोजी मोरीगाव येथे ५.१ तीव्रतेचा भूकंप आला आहे. दरम्यान वारंवार होणाऱ्या या हालचालींमुळे हे मोठ्या भूकंपाचे संकेत आहेत का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या दृष्टीने तज्ज्ञ अभ्यास करत आहेत. प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन पथकांना हाय अलर्टवर राहण्याचे आदेश दिले आहेत.
मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, अद्याप कोणत्याही मोठ्या जीवितहानीचे वृत्त नाही. मात्र, मोरीगाव आणि ग्रामीण भागातील काही कच्च्या घरांना तडे गेल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने नुकसानीचा आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी इमर्जन्सी किट तयार ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.