शाहांची सभा संपली आणि भाजप कार्यकर्त्यांवर कोण तुटून पडलं? बंगालमध्ये राडा

| Updated on: Dec 19, 2020 | 9:07 PM

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर पश्चिम बंगालमध्ये हल्ला झाल्याची घटना ताजी असताना शनिवारी पुन्हा अशाचप्रकारच्या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे (Attack on BJP workers in West Bengal)

शाहांची सभा संपली आणि भाजप कार्यकर्त्यांवर कोण तुटून पडलं? बंगालमध्ये राडा
Follow us on

कोलकाता : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर पश्चिम बंगालमध्ये हल्ला झाल्याची घटना ताजी असताना शनिवारी पुन्हा अशाचप्रकारच्या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे (Attack on BJP workers in West Bengal). पश्चिम बंगालच्या मिदनापूर येथील दासपूर भागात अज्ञात हल्लेखोरांनी भाजप कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात भाजप कार्यकर्त्यांच्या वाहनांचंदेखील मोठं नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. मेघालय आणि त्रिपुराचे माजी राज्यपाल तथागत रॉय यांनी ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. “भाजप कार्यकर्त्यांवक हा हल्ला तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी केला आहे”, असा आरोप त्यांनी केला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शनिवारी (19 डिसेंबर) पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांची मिदनापूर येथे भव्य सभा झाली. ही सभा आटोपून आपल्या घराकडे परतत असणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर काही लोकांनी हल्ला केला, अशी माहिती तथागत रॉय यांनी दिली (Attack on BJP workers in West Bengal). दरम्यान, या हल्ल्याचा सूत्रधार कोण आहे? हे समोर आलेलं नाही.

बंगालमध्ये अनेक दिग्गज नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आज पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्याच्यादरम्यान मेदिनीपुर येथे मोठी सभा आयोजित करण्यात आली. यावेळी बंगालचे माजी मंत्री शुभेंद्र अधिकारी यांच्यासह 11 आमदार, एक खासदार आणि एक माजी खासदार यांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. या कार्यक्रमात भाषणादरम्यान अमित शाहा यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. आगामी निवडणूक येईपर्यंत तृणमूल काँग्रेसमध्ये फक्त ममता दीदीच राहतील, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.

“ममता दीदी म्हणतात, भाजप फक्त पक्षांतर करायला लावते. मी दीदींना विचारु इच्छितो, तुमचा खरा पक्ष कोणता होता? तुम्ही काँग्रेसला सोडून तृणमूलची निर्मिती केली ते काय होतं? दीदी खरंतर पक्षांतर ते होतं. आता ही सुरुवात आहे. निवडणूक येईपर्यंत शेवटी तुम्ही एकट्या राहाल”, असा चिमटा त्यांनी काढला.

“आज पश्चिम बंगालमध्ये आमच्यासोबत एक खासदार, एक माजी मंत्री, एक एमओएस, 15 काउंसलर, 45 चेअरमेम आणि दोन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष जोडले गेले आहेत”, अशी माहिती शाह यांनी दिली.