तीन दिवस बँक कर्मचारी संपावर, मग आता सॅलरी कधी जमा होणार? कामाची बातमी
बँक कर्मचारी तीन दिवसांच्या संपावर जाणार आहेत. त्यामुळे बँकिंग कामाचा खोळंबा होण्याची शक्यता आहे, तसेच हा संप महिन्याच्या शेवटी असल्यामुळे पगार कधी जमा होणार? असा प्रश्नही अनेकांना पडला आहे.

जर तुमचाही पगार हा महिन्याच्या शेवटी होत असेल तर या महिन्यात मात्र तुमचं टेन्शन वाढणार आहे. त्याचं कारण म्हणजे 28 सप्टेंबर, 29 सप्टेंबर आणि 30 सप्टेंबर असे तीन दिवस बँक कर्मचारी संपावर जाणार असल्यामुळे बँका बंद राहणार आहेत. दरम्यान त्यापूर्वी 26 सप्टेंबर रोजी चौथा शनिवार आहे, तर रविवारी आठवड्याची रजा असल्यामुळे बँका सलग पाच दिवस बंद राहण्याची शक्यता आहे. याचाच अर्थ सलग पाच दिवस बँकेचं कामकाज प्रभावित होऊ शकतं. त्यामुळे आता नोकरदार वर्गापुढे सर्वात मोठा प्रश्न आहे, तो म्हणजे बँकांना असलेल्या सलग सुट्ट्यांमुळे अकाऊंटला सॅलरी कधी जमा होणार? कोणाची सॅलरी लवकर जमा होणार आणि कोणाची सॅलरी लेट होणार? आपल्या विविध मागण्यांसाठी बँक यूनियनकडून तीन दिवसांच्या संपाची घोषणा करण्यात आल्यामुळे बँकिंग कामाचा खोळंबा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान या सर्व सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आपले सर्व कर्मचारी पेंशनर्स यांचा पगार हा 25 सप्टेंबर रोजीच जमा होणार आहे. या संदर्भात अर्थ मंत्रालयाकडून निर्देश देण्यात आले आहेत. सॅलरीवर बँकांनी पुकारलेल्या संपाचा परिणाम होऊ नये, यासाठी केंद्र सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोणाची सॅलरी होणार लेट?
जर तुमची कंपनी तुमच्या बँक खात्यात 28 सप्टेंबर पूर्वी सॅलरी जमा करणार असेल तर तुम्हाला तुमचा पगार वेळेवर मिळू शकतो. मात्र ज्या कंपन्या या आपल्या कर्मचाऱ्यांचे पगार हे महिन्याच्या शेवटच्या तारखेला करतात, त्यांच्या पगाराला मात्र यावेळी विलंब होऊ शकतो. सर्व सामान्यपणे प्रायव्हेट सेक्टरमध्ये कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांचा पगार या महिन्याच्या शेवटच्या तारखेलाच जमा करतात. त्यामुळे या महिन्यात खासगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांचा पगार लेट होण्याची शक्यता आहे.
बँकेचा संप कशासाठी?
आपल्या विविध मागण्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांकडून संपाची घोषणा करण्यात आली आहे. पाच दिवसांचा आठवडा करावा ही त्यांची मुख्य मागणी आहे. आपल्या या मागणीसाठी आता बँक कर्मचारी तीन दिवसांच्या संपावर जाणार आहेत. या काळात ग्राहकांची मोठी गौरसोय होण्याची शक्यता आहे.