Tuljapur Fire: तुळजाभवानी मंदिर परिसरात भीषण आग! दर्शनासाठी आलेल्या भाविकांची सैरावैरा धावपळ; २४ तासांत दुसरी घटना
Fire Scare Near Tulja Bhavani Temple: तुळजाभवानी मंदिर परिसरात आगीचा भडका उडाल्याचे दिसून आले आहे. यामुळे दर्शनासाठी आलेल्या भाविकांची धावपळ उडाली आहे. या घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली आहे.

तुळजापूरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पाडव्याच्या सणानिमित्त तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी हजारो भाविक तुळजापुरात दाखल झाले आहे. अशातच आज दुपारी बिडकर तलाव परिसरात अचानक आगीचा मोठा भडका उडाला. आगीचे लोळ आणि धुराचे लोट दिसताच परिसरात एकच खळबळ उडाली. दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये घबराट पसरली आहे. अनेकांनी सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी धावपळ केली.
मिळालेल्या माहितीनुसार, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पाडव्याच्या निमित्ताने तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह परराज्यांतून हजारो भाविक तुळजापुरात आले आहेत. मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना याच मार्गावरून मंदिरात सोडले जात आहे. अशातच आज दुपारी बिडकर तलाव परिसरातील डोंगरावर अचानक आग लागली. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले.
डोंगरावरील वाळलेली झाडे आणि परिसरात भाविकांनी टाकलेला कचरा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. आगीचा धूर आणि ज्वाळा दिसताच दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही काळ परिसरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
फटाक्यांमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत अधिक माहिती घेतली जात आहे. विशेष म्हणजे गेल्या २४ तासांत तुळजापुरात आगीची ही दुसरी घटना आहे. त्यामुळे मंदिर परिसरातील सुरक्षिततेचा आणि आगीच्या घटनांना आळा घालण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सणासुदीच्या काळात मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने अशा घटनांमुळे भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
तर अक्कलकोटमध्ये पार्किंगमध्ये थांबलेल्या ट्रकना भीषण आग लागली आहे. सोलापूर-अक्कलकोट महामार्गावरील खासगी पार्किंगमध्ये ट्रक थांबले होते. सुरुवातीला एक ट्रकला आग लागली. त्यानंतर शेजारी थांबलेल्या ट्रकला सुद्धा आग पसरत गेली. आतापर्यंत जवळपास 5-6 ट्रक जळून खाक झाले आहेत. अजूनही अनेक ट्रक या खासगी पार्किंगमध्ये लावलेले आहेत. अक्कलकोट नगरपरिषदेच्या अग्निशमन दलातर्फे आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
