
भारतानं रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी थांबवावी यासाठी सातत्यानं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारतावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लावल्यानंतर त्याचा काहीसा परिणाम हा भारताच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे, रुपयामध्ये देखील घसरण सुरूच आहे. भारतावर वाढत असलेला टॅरिफचा दबाव आणि रुपयामध्ये सुरू असलेली घसरण या पार्श्वभूमीवर आता भारतासाठी आंतरराष्ट्रीय बाजारातून एक गुड न्यूज समोर आली आहे.
मूडीज या रेटिंग्ज संस्थेनं भारताचे दीर्घकालीन आणि परदेशी चलन जारीकर्ता रेटिंग स्थिर आउटलुकसह Baa3 वर कायम ठेवले आहे. भारताचा आर्थिक वृद्धीदर हा झपाट्यानं वाढू शकतो असा अंदाज मूडीजकडून वर्तवण्यात आला आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेपुढे अजूनही काही आव्हाने आहेत, मात्र ती दीर्घकालीन नाहीयेत, परंतु दुसरीकडे भारताच्या आर्थिक वृद्धीदरात मात्र दीर्घकाळ मजबूत वाढ पहायला मिळू शकते असा अंदाज मूडीजनं व्यक्त केला आहे.
मूडीजने पुढे आपल्या अहवालात असं देखील म्हटलं आहे की, भारताचा स्थिर आउटलुक हा भारताच्या आर्थिक वृद्धीदरासाठी पोषक आहे. त्यामुळे हळूहळू भारताची आर्थिक स्थिती ही त्यांच्या इतर प्रतिस्पर्धी देशाच्या तुलनेत अधिक मजबूत होऊ शकते. परंतु जीएसटीमध्ये करण्यात आलेली कपात, अनिश्चित जागतिक धोरण आणि रेपो रेट या अशा काही गोष्टी आहेत, ज्याचा परिणाम हा अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. या गोष्टी अर्थव्यवस्थेला आव्हान देऊ शकतात, असं मूडीजनं म्हटलं आहे.
अमेरिकेचा दबाव
दरम्यान भारतानं रशियाकडून तेल खरेदी करू नये, यासाठी डोनाल्ड ट्रम्प हे भारतावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतो, त्या पैशांचा उपयोग रशिया हा युक्रेन युद्धात फंडिग म्हणून करत असल्याचा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. रशिया आणि युक्रेन युद्ध थांबवायचं असेल तर अशाप्रकारची फंडिंग बंद केली पाहिजे असंही त्यांनी म्हटलं आहे. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लावल्यानंतरही भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी सुरूच ठेवली आहे.