
पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहार दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भागलपूर दौरा सुरु असताना त्यांना मारण्याची धमकी देणारा मेसेज आला. हा मेसेज मिळाल्यावर सुरक्षा संस्था सक्रीय झाल्या. या प्रकरणात बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील सुल्तानगंज येथील एका व्यक्तीला अटक करण्यात आली. तपासात त्याने धक्कादायक खुलासा केला आहे. काकांना फसवण्यासाठीच आपण हा धमकी देणारा मेसेज पाठवल्याचे त्याने सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी दोन दिवशीय बिहार दौऱ्यासाठी पोहचले. शुक्रवारी त्यांचा रोहतास जिल्ह्यातील बिक्रमगंज येथे कार्यक्रम होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी पाटणात पोहचण्यापूर्वी भागलपूर पोलिसांना मेसेज मिळाला. या मेसेजमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाटण्यात उडवण्याची धमकी दिली. मेसेज मिळाल्यानंतर सर्वच सुरक्षा यंत्रणा हादरल्या. सुरक्षा यंत्रणा त्वरीत कामाला लागला. मेसेज पाठवण्याचा शोध सुरु झाला.
पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे मेसेज पाठवणाऱ्याचा नंबर शोधला. तो मोबाइल क्रमांक भागलपूर जिल्ह्यातील सुल्तानगंज महेशी येथील रहिवाशी मंटू चौधरी यांच्या नावाने रजिस्टर्ड आहे. ते वयस्कर व्यक्ती आहेत. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी सुरु केली. त्यावेळी आणखी धक्कादायक माहिती समोर आली. मंटू चौधरी यांच्या पुतण्याने काकांना फसवण्यासाठी तो मेसेज पाठवला. दोघांमध्ये जमिनीचा वाद आहे. त्यामुळे मंटू चौधरी यांच्या पुतण्या समीरकुमार रंजन याने मेसेज केला.
समीरकुमार याने भागलपूर एसपीसह इतर पोलीस ठाण्यात मेसेज पाठवला होता. त्याबाबत बोलताना एसपी हृदयकांत यांना सांगितले की, समीरकुमार याचा काकांसोबत जमिनीवरुन वाद झाला. त्यामुळे त्यांना फसवण्यासाठी त्याने हा मेसेज पाठवला.
पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले की, मंटू चौधरी यांचा फोन समीरकुमार याच्या फिंगरप्रिंटने सुरु होतो. त्यानेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भागलपूर दौऱ्या दरम्यान पाटणा विमानतळावर बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा मेसेज केला. त्यासाठी त्याने व्हिपीएन प्रणालीचा वापर केला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याची कसून चौकशी केली जात आहे.