राज ठाकरे यांना बृजभूषण यांचे आव्हान, इतिहास सांगत दिला हा सल्ला

बृजभूषण शरण सिंह म्हणाले, मी राज ठाकरे यांना सांगू इच्छितो की त्यांनी थोडे वाचावे. आज ज्या गोष्टींचा तुम्हाला अभिमान आहे, त्या अभिमानाच्या इतिहासात उत्तर भारतीयांचा घाम आहे. तुम्ही खूप स्वस्त राजकारण करत आहात.

राज ठाकरे यांना बृजभूषण यांचे आव्हान, इतिहास सांगत दिला हा सल्ला
| Updated on: Jul 11, 2025 | 10:57 AM

राज्यातील शाळांमध्ये करण्यात येणारी हिंदी सक्तीच्या विषयांवर आक्रमक पवित्रा घेतलेल्या मनसे नेते राज ठाकरे यांना भाजप नेत्याने आव्हान दिले आहे. राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांनी पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्याविरोधात दंड थोपटले आहे. ‘भाषा जोडण्याचे काम करते, तोडण्याचे नाही. महाराष्ट्र आणि उत्तर भारतीय यांचे जे नाते आहे, ते तुमच्या या प्रकारामुळे तुटणार नाही,’ असे बृजभूषण यांनी म्हटले आहे.

बृजभूषण काय म्हणाले?

बृजभूषण शरण सिंह म्हणाले, मी राज ठाकरे यांना सांगू इच्छितो की त्यांनी थोडे वाचावे. आज ज्या गोष्टींचा तुम्हाला अभिमान आहे, त्या अभिमानाच्या इतिहासात उत्तर भारतीयांचा घाम आहे. तुम्ही खूप स्वस्त राजकारण करत आहात. छत्रपती शिवाजी महाराज यांना औरंगजेबाने जेव्हा आग्रात कैद केले होते, तेव्हा आमच्या आग्रा येथील व्यापाऱ्यांनी त्यांना मुक्त करण्यासाठी मदत करत होती.

…तर ते आव्हान राज ठाकरे पेलू शकणार नाही

राज ठाकरे यांच्यावर टीका करताना बृजभूषण म्हणाले, राज ठाकरे यांनी जेव्हा अयोध्येत येण्याचा कार्यक्रम निश्चित केला, तेव्हा मी त्यांना अयोध्येत येऊ न देण्याचा इशारा दिला होता. त्यावेळी राज ठाकरे यांनी आपला दौरा रद्द केला. परंतु आता पुन्हा आपले रंग दाखवत आहेत. राज ठाकरे यांच्या या भूमिकेमुळे उत्तर भारतीयांमध्ये खूप राग आहे. यामुळे उत्तर भारतीयांमधील एखाद्या मोठ्या व्यक्तीने राज ठाकरे यांना आव्हान दिले तर ते पेलू शकणार नाही. त्यामुळे माझा राज ठाकरे यांना सल्ला आहे, राजकारण करा, परंतु भाषा, जाती, धर्म यांना आधार घेऊ नका, असे त्यांनी म्हटले.

फडणवीस सरकारने महाराष्ट्रातील शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र लागू केले होते. शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची केली होती. त्या निर्णयाला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी विरोध केला होता. त्यासाठी ५ जुलै रोजी मोर्चा काढणार होते. त्यापूर्वीच फडणवीस सरकारने हा निर्णय रद्द करत नरेंद्र जाधव यांची समिती नेमली. मोर्चा रद्द झाल्यानंतर राज आणि उद्धव ठाकरे यांनी विजयी सभा घेतली. त्यावेळी २० वर्षांनंतर राज आणि उद्धव ठाकरे एकत्र एका व्यासपीठावर आले.