
उत्तराखंडसह अनेक डोंगराळ राज्यं सध्या निसर्गाच्या प्रकोपाचा सामना करत आहेत. ढगफुटीमुळे अनेक भागात परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. वारंवार होणाऱ्या भूस्खलनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. किती नुकसान झालं त्याची काही गणीतच नाहीये. याच दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. या भूस्खलनातून भाजप खासदार अनिल बलुनी हेही थोडक्यात बचावले. त्यांच्या डोळ्यांसमोरच संपूर्ण डोंगर कोसळला. सुदैवाने त्यांना काहीही दुखापत झाली नसली तरी, जर ते एक इंचही पुढे सरकले असते तर क्षणात होत्याचं नव्हतं झालं असतं.
भाजप खासदार अनिल बलुनी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. रस्त्यावर अचानक डोंगराचा भाग कोसळला आणि मोठा ढिगारा साचल्याचे या व्हिडीओत दिसले. त्यावेळी रस्त्यावर अनेक वाहने देखील होती.मात्र सुदैवाने कोणतंही वाहन त्या ढिगाऱ्याखाली अडकलं नाही. पण मोठा डोंगर क्षणात कोसळल्याने आणि स्वत:च्या डोळ्यांनी ही दुर्घटना पाहिल्याने अनेक नागरिक हादरले.
शेअर केला व्हिडीओ
यावर्षी उत्तराखंडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि भूस्खलनामुळे इतके खोल जखमा झाल्या आहेत की त्या भरून येण्यास बराच वेळ लागेल असे अनिल बलुनी यांनी व्हिडीओ शेअर करताना त्यासोबत लिहीलं. काल संध्याकाळी आपत्तीग्रस्त भागात झालेल्या भूस्खलनाचे एक भयानक दृश्य मी तुम्हा सर्वांसोबत शेअर करत आहे. आपल्या उत्तराखंडला सध्या ज्या विनाशकारी नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत आहे त्याबद्दल हे दृश्य बरंच काही सांगत असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
उत्तराखंड में इस वर्ष आई भीषण अतिवृष्टि और भूस्खलन ने इतने गहरे घाव दिए हैं, जिन्हें भरने में बहुत समय लगेगा।
कल शाम आपदा प्रभावित क्षेत्र में भूस्खलन का एक भयावह दृश्य आप सभी के साथ साझा कर रहा हूं। यह दृश्य स्वयं बता रहा है कि हमारा उत्तराखंड इस समय कितनी भीषण प्राकृतिक आपदा… pic.twitter.com/fdTsXpPsm2
— Anil Baluni (@anil_baluni) September 18, 2025
सर्व लोकांच्या सुरक्षित आयुष्यासाठी, चांगल्या आरोग्यासाठी आणि आनंदासाठी मी बाबा केदारनाथ यांच्याकडे प्रार्थना करतो. आपत्तीच्या या प्रसंगी, लोकांच्या सेवेत गुंतलेल्या सर्व अधिकाऱ्यांच्या, एनडीआरएफ एसडीआरएफच्या सैनिकांच्या, प्रशासनाच्या आणि कठीण परिस्थितीतही रस्त्यांवरील कचरा हटवणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सेवेच्या भावनेचे मी कौतुक करतो असेही त्यांनी या पोस्टमध्ये लिहीलं.
अनेक ठिकाणी झाली ढगफुटी
ढगफुटीमुळे उत्तराखंडसह अनेक राज्यांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. काल देहरादून आणि आज चमोली येथे ढगफुटीमुळे मोठे नुकसान झाले. ढगफुटीमुळे अनेक भागात पोहोचणे आता कठीण झाले आहे. याच कारणामुळे प्रशासनाने लोकांना घरात राहण्याचे आवाहन केले आहे. मात्र आमची घरं पाण्याखाली गेली आहेत. आम्ही घरात कसे राहू शकतो? असा सवाल नागरिकांनी विचारला आहे.
मुख्यमंत्री पुष्कर यांनी व्यक्त केला शोक
चमोली येथे ढगफुटीमुळे 10 हून अधिक लोक बेपत्ता आहेत. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. चमोली जिल्ह्यातील नंदनगर घाट परिसरात मुसळधार पावसामुळे जवळच्या घरांचे नुकसान झाल्याची दुःखद बातमी मिळाली आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत असे त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत लिहीले. या प्रकरणाबाबत प्रशासनाशी सतत संपर्कात आहे आणि स्वतः परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे असेही त्यांनी पोस्टमध्ये नमूद केलं.