U.P. Elections 2027 : मोठ्या हालचाली… भाजप भाकरी फिरवणार? थेट बड्या नेत्यांना घरचा रस्ता; मोठा प्लान आला समोर
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि प्रदेश प्रभारी विनोद तावडे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने रणनीती आखली आहे. 125 जागांवर सर्व्हे करत संभाव्य उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. जिंकण्याची क्षमता असलेल्या चेहऱ्यांनाच संधी देण्यासाठी विद्यमान आमदारांना बदलण्याचा भाजपचा मोठा 'प्लान' समोर आला आहे.

भाजपने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची रणनीती तयार केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सातत्याने जिल्ह्यांचे दौरे करत आहेत. तर पक्षाचे प्रदेश प्रभारी विनोद तावडेही विविध जिल्ह्यातील संघटनेच्या स्थितीचा आढावा घेत असून संभाव्य उमेदवारांचा फिडबॅक घेत आहेत. विनोद तावडे यांनी आतापर्यंत 125 जागांचा सर्व्हे केल्याची चर्चा आहे. निवडणुकीच्या मैदानात विजय मिळवेल अशा चेहऱ्यावरच पक्षाने फोकस ठेवला आहे. त्यामुळेच सर्व्हेच्या आधारे भाजप काही विद्यमान आमदारांचे पंख कापणार असल्याचं सांगितलं जात आहे. म्हणजे या बड्या नेत्यांना घरी बसवण्यात येणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप उत्तर प्रदेशात भाकर फिरवणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
उत्तर प्रदेशातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने संघटनात्मक कार्यक्रमांवर भर दिला आहे. पक्षीय पातळीवर संभाव्य उमेदवार, विद्यमान आमदारांची ताकद आणि स्थानिक राजकीय समीकरणे आदींचा आढावा घेतला जात असल्याची चर्चा आहे. उत्तर प्रदेशात भाजपमध्ये दोन स्तरावर काम सुरू आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे संपूर्ण यूपी पिंजून काढत आहेत. रोज नव्या जिल्ह्यात जाऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत. तसेच तिथल्या समस्या मार्गी लावत आहेत. दुसरीकडे विनोद तावडे हे संघटनात्मक पातळीवर आढावा घेत आहेत. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. विद्यमान आमदार आणि संभाव्य उमेदवार यांचा फिडबॅक घेत आहेत.
125 जागांवर सर्व्हे
भाजपशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 125 विधानसभा जागांवर सर्व्हे झालं आहे. संघटनेच्या वेगवेगळ्या पातळीवरून माहिती गोळा करण्यात आली आहे. बुथ कमिटी, शक्ती केंद्र आणि स्थानिक नेत्यांकडून संभाव्य उमेदवारांची लोकप्रियता तसेच निवडणूक जिंकण्याची क्षमता आदींची माहिती घेतली जात आहे. विद्यमान आमदारांबाबत जनतेची मते काय आहेत? कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.
आमदारांना घरी पाठवणार?
दरम्यान, भाजपच्या निवडणूक रणनीतीत उमेदवारांची निवड हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्या विद्यमान आमदारांच्या विरोधात मतदारसंघात नाराजी आहे. त्यांना अँटी इन्कम्बन्सीचा सामना करावा लागू शकतो, अशी चर्चा आहे. त्यांनी तिकीट देण्यावर पक्षाकडून पुन्हा विचार होण्याची शक्यता आहे. कोणता चेहरा येत्या निवडणुकीत चांगला रिजल्ट देऊ शकतो, हे सर्व्हेतून जाणून घेतलं जात आहे. एखाद्या मतदारसंघात विद्यमान आमदाराची स्थिती कमकुवत वाटली तर तिथे नवीन उमेदवाराला संधी देण्याचा विचार होऊ शकतो, असं सूत्रांनी सांगितलं.
