वातावरण फिरलं? तब्बल 100 आमदारांचं तिकीट कापणार, आगामी निवडणुकीसाठी भाजपचा मास्टर प्लान काय?
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत तब्बल 100 आमदारांचं तिकीट कापण्याची शक्यता आहे. तर आगामी निवडणुकीसाठी भाजपने मास्टर प्लान आखला आहे.

उत्तर प्रदेशमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. सध्या उत्तर प्रदेशातील राज्यसभेच्या जागांवरील निवडणुकीवर साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. तसेच सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी देखील तयारी सुरू केली आहे. भाजप यंदा तिकीट वाटपाबाबत सतर्क राहणार असल्याची माहिती हाती आली आहे. उत्तर प्रदेशातील यंदा 100 आमदारांचं तिकीट कापणार असल्याचे बोलले जात आहे. पक्षातील अंतर्गत सर्व्हेनंतर अनेक दावे-प्रतिदावे करण्यात येत आहे. राज्यातील एखाद्या आमदाराच्या विरोधात पदाधिकाऱ्याचा असंतोष असेल, आमदाराच्या विरोधात वातावरण असेल, तर अशा आमदाराला पुन्हा तिकीट मिळण्याची शक्यता कमी असणार आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, भाजपने जवळपास 100 आमदारांवर विश्वास कमी दाखवला आहे. अनेक आमदारांचे पदाधिकाऱ्यांशी मतभेद समोर आले आहेत. तिकीटाचं वाटप करताना आरएसएसचा देखील सल्ला घेतला जाणार आहे. या सर्व गोष्टीचा विचार करून तिकीट वाटप केलं जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप विधानसभा क्षेत्रानुसार सर्व्हे करत आहेत. या व्यतिरिक्त यंदा भाजपकडून सर्वाधिक जागा जिंकण्यावर भर दिला जाणार आहे. भाजप सलग सत्तेत विराजमान होण्यासाठी फिल्डिंग लावत आहे. काही मतदारसंघात दोन वेळा बाजी मारली आहे.
काही मतदारसंघात पदाधिकारी आणि आमदारामधील मतभेद पाहिले जात आहेत. संघटनेतील मतभेदामुळे निवडणुकीवर परिणाम होतो, असा दावा केला जात आहे. या व्यतिरिक्त पक्ष नव्या चेहऱ्यावरही विश्वास दाखवण्याची शक्यता आहे. मागील काही महिन्यांपासून जेन-झी मोर्चे चर्चेत आहेत. त्यामुळे जेन-झी आंदोलनामुळे निवडणुकीत बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. जुन्या चेहऱ्यांना संधी देण्याऐवजी नवीन आणि युवकांना, संधी मिळण्याची शक्यता आहे.
2024 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपची 30 मतदारसंघात घसरण पाहायला मिळाली. 2019 साली झालेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपच्या 2024 साली झालेल्या निवडणुकीत लोकसभेच्या जागा कमी जिंकल्या. भाजप 62 जागांवरून 33 जागेवर पोहोचलं. मागील लोकसभा निवडणुकीत 49 खासदारांना पुन्हा तिकीट दिलं होतं. त्यातील 27 जणांना पराभवाला सामोरे जावं लागलं. यंदा दोन वेळा जिंकणाऱ्या उमेदवाराविरोधात वातावरण असेल, तर त्या आमादाराला संधी मिळण्याची शक्यता कमी मानली जात आहे.