
BSF Soldier Enters In Pakistan Border : एकीकडे पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाचं वातावरण असताना आता दुसरीकडे मोठी माहिती समोर येत आहे. भारताच्या बीएसएफचा एक जवान चुकून पाकिस्तानच्या हद्दीत घुसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार भारतीय बीएसएफचा एक जवान चुकून पाकिस्तानच्या सीमेत गेला आहे. या जवानाचं नाव पूनम कुमार असं आहे. पाकिस्तानच्या सैनिकांनी पूनम कुमार यांना ताब्यात घेतलं आहे. ते श्रीनगरमधील बीएसफच्या यूनिट 24 मध्ये तैनात होते. चुकून पाकिस्तानमध्ये घुसल्यानंतर आता या जवानाचे काही फोटो समोर आले आहेत. पूनम कुमार हे एका कारमध्ये बसल्याचे दिसत आहे. सोबतच त्यांच्या डोळ्यावल एक पट्टी बांधण्यात आल्याचं दिसतंय. विशेष म्हणजे ते सैनिकी पोषाखातच दिसत आहेत.
सध्यातरी पूनम कुमार हे पाकिस्तानमध्ये आहेत. एकीकडे पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला आहे. या दोन्ही देशांनी एकमेकांविरोधात कठोर निर्णय घेतले आहेत. भारताने तर या हल्ल्याचा मोठा बदला घेतला जाईल, असे जाहीरपणे बोलून दाखवले आहे. असे असतानाच आता भारताचा बीएसएफचा जवान थेट पाकिस्तानमध्ये चुकून घुसला आहे. त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार? याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे. सोबतच पूनम कुमार यांना परत आणण्यासाठी भारत नेमकं काय करणार? हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
भारत-पाकिस्तानचे एकमेकांविरोधात निर्णय
भारताने पाकिस्तानची कायदेशीर पद्धतीने कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. भारताने सिंधू जलवाटप करार स्थगित केला आहे. तसेच भारताने अटारी सीमा बंद केली आहे. यासह भारताने पाकिस्तानच्या सर्व लष्करविषयक सल्लागारांना भारतातून जाण्यास सांगितलं आहे. सोबतच भारताने राजनैतिक अधिकारी कमी करण्याचाही निर्णय घेतला आहे. या कोंडीनंतर पाकिस्तान चांगलाच चवताळला आहे. पाकिस्तानने भारतासोबत कोणताही व्यापर न करण्याचा निर्णय घेतला. सोबतच पाकिस्तानने वाघा बॉर्डर बंद केली आहे. पाकिस्तानने भारतीय नागरिकांना 48 तासांत पाकिस्तान सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासह भारतासाठी त्यांनी एअरस्पेसही बंद केला.
या दोन्ही देशांच्या भूमिकेनंतर भविष्यात नेमके काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील परिस्थितीचे पडसाद जागतिक पातळीवरही पडू शकतात.