
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यंदाच्या वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. यंदाचा हा अर्थसंकल्प गंभीर आजारांशी झुंजणाऱ्या सामान्य नागरिकांसाठी आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी खऱ्या अर्थाने महत्त्वाचा ठरला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत आपला सलग नववा अर्थसंकल्प सादर करताना आरोग्य क्षेत्रासाठी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. यावेळी त्यांनी कर्करोग (Cancer), मधुमेह (Diabetes) आणि स्वयंप्रतिकार रोगांच्या (Auto-immune diseases) औषधांच्या किंमती कमी करण्यावर सरकार मोठा भर देणार असल्याची घोषणा केली.
अनेकदा कर्करोग किंवा मधुमेहासारख्या आजारांचे निदान झाले की उपचारांच्या खर्चामुळे मध्यमवर्गीय कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळते. यातील अनेक औषधे परदेशातून आयात करावी लागत असल्याने ती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असतात. हेच लक्षात घेऊन सरकारने या औषधांवरील आयात शुल्क (Import Duty) आणि इतर करांमध्ये सवलत देणार असल्याची माहिती दिली आहेत. यामुळे जी औषधे पूर्वी लाखांच्या घरात असायची, ती आता स्वस्त होतील. ज्यामुळे उपचारांअभावी कोणताही नागरिक वंचित राहणार नाही, असे निर्मला सीतारमण यांनी म्हटले.
केवळ औषधे स्वस्त करून न थांबता, भारताला औषध निर्मितीचे ग्लोबल हब बनवण्यासाठी सरकारने १० हजार कोटींचे बायो-फार्मा शक्ती मिशन जाहीर केले आहे. या मिशन अंतर्गत पुढील पावले उचलली जाणार आहेत.
जागतिक बाजारात ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरमुळे निर्माण झालेली अस्थिरता आणि महागाई असतानाही भारताने ७.४ टक्के विकास दराचे उद्दिष्ट ठेवले आहे. अर्थमंत्र्यांनी या अर्थसंकल्पाला युवा शक्तीचा अर्थसंकल्प असे संबोधले आहे. केवळ शब्दांचा खेळ न करता ठोस कृतीवर भर दिला आहे. यात तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यापासून ते एमएसएमई (MSME) क्षेत्राला जागतिक स्तरावर विजेते बनवण्यासाठी सहा धोरणात्मक क्षेत्रांमध्ये मोठा बदल करण्याची घोषणा केली आहे. थोडक्यात सांगायचे तर मोदी सरकारचा हा अर्थसंकल्प भारताच्या आरोग्य व्यवस्थेला बळ देणारा असल्याचे बोललं जात आहे.