ऑपरेशन सिंदूर शिगेला पोहोचला असताना अचानक शस्त्रसंधी का? सीडीएस अनिल चौहान यांनी सांगितले कारण

ऑपरेशन सिंदूर सुरु असताना भारत आणि पाकिस्तान दरम्यान अचानक शस्त्रसंधी झाली. त्याबद्दल अनेकांना आश्चर्य वाटत आहे. त्यावर सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे २० दिवसांनी यासंदर्भातील कारण समोर आले आहे.

ऑपरेशन सिंदूर शिगेला पोहोचला असताना अचानक शस्त्रसंधी का? सीडीएस अनिल चौहान यांनी सांगितले कारण
anil chauhan
| Updated on: May 31, 2025 | 12:45 PM

Operation Sindoor Ceasefire News: भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले. ऑपरेशन सिंदूर शिगेला पोहचला असताना १० मे रोजी संध्याकाळी भारत आणि पाकिस्तानमध्ये अचानक शस्त्रसंधीची घोषणा झाली. या निर्णयाबद्दल अनेकांना आश्चर्य वाटले. जनतेच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला की इतक्या लवकर हा निर्णय का घेण्यात आला.

काय म्हणाले सीडीएस अनिल चौहान?

शस्त्रसंधीच्या निर्णयास सुमारे २० दिवस झाले. त्यानंतर आता याबद्दल स्पष्टीकरण आले आहे. शनिवारी सिंगापूरमध्ये झालेल्या शांग्री-ला संवादमध्ये सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी त्याचे कारण स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, भारताने हे पाऊल उचलण्यामागे रणनीतीचा भाग आहे. भारताने तीन दिवसांत आपले ठरवलेले सर्व लक्ष्य साध्य केले होते. यामुळे कारवाई थांबवणे योग्य पाऊल आहे.

ऑपरेशन सिंदूर ६-७ मे रोजी रात्री झाले. त्यात पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवाद्यांची तळ उद्ध्वस्त करण्यात आली. या कारवाईत १०० पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले. त्यात जैश-ए-मोहम्मदचा नेता अब्दुल रऊफ अझहर याचाही समावेश आहे. भारतीय सैन्याच्या अचूक हल्ल्यामुळे पाकिस्तानची संरक्षण प्रणालीस नुकसान पोहचले. पाकिस्तानच्या स्कर्दू, जैकबाबाद, सरगोधा आणि भोलारी सारख्या हवाई तळाचे मोठे नुकसान झाले. १० मे रोजी सकाळी भारताने ब्राह्मोस क्षेपणास्त्राने हल्ले केले. त्यात पाकिस्तानच्या नूर खान-चकलाला विमानतळाचे मोठे नुकसान झाले. या हल्ल्यात पाकिस्तानचे सैनिकही ठार झाले. त्यानंतर पाकिस्तानने शस्त्रसंधीचा प्रस्ताव ठेवला. तो भारताने स्वीकारला.

सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी सिंगापूरमध्ये सांगितले की, भारताने पाकिस्तानसोबत संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला. परंतु पाकिस्तानकडून नेहमी शत्रूत्व मिळाले. त्यामुळे लांब राहणेच योग्य आहे. आता भारतच बदलला नाही तर भारताचे धोरणसुद्धा बदलले आहे.

काय आहे शांग्री-ला संवाद?

शांग्री-ला संवाद हा जगातील संरक्षण प्रमुखांचे सर्वात मोठे व्यासपीठ आहे. शांग्री-ला संवादात ४० हून अधिक देशांचे लष्करी अधिकारी आले आहेत. यामध्ये भारतीय आणि पॅसिफिक क्षेत्रातील आव्हानांवर चर्चा होत आहे. या व्यासपीठावर भारताने पाकिस्तानला आरसा दाखवला.