कोलकातामध्ये अग्नितांडव, हॉटेलच्या आगीत 14 जणांचा होरपळून मृत्यू

ही आग नेमकी कशामुळे लागली, नेमकं काय घडलं, याबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नाही. सध्या या घटनेची चौकशी सुरु आहे.

कोलकातामध्ये अग्नितांडव, हॉटेलच्या आगीत 14 जणांचा होरपळून मृत्यू
Kolkata fire
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 30, 2025 | 9:54 AM

पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील एका हॉटेलला रात्री भीषण अग्नितांडव पाहायला मिळाले. कोलकातामध्ये मंगळवारी रात्री मेचुआपट्टी भागातील श्रतुराज हॉटेलमध्ये भीषण आग लागली. या आगीत १४ लोकांचा होरपळून मृत्यू झाला. तर काही जणांनी जीव वाचवण्यासाठी हॉटेलच्या इमारतीतून उड्या घेतल्या. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या गाड्यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

कोलकाताचे पोलीस आयुक्त मनोज कुमार वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, “श्रतुराज हॉटेलमध्ये रात्री ८.१५ वाजता आग लागली. या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर हॉटेलमध्ये अडकलेल्या अनेकांना बचाव पथकांनी सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. या आगीवर सध्या नियंत्रण मिळवण्यात आले आले. मात्र तरीही मदत आणि बचाव कार्य अजूनही सुरू आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली, नेमकं काय घडलं, याबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नाही. सध्या या घटनेची चौकशी सुरु आहे. यासाठी एका विशेष तपास पथकाची नेमणूक करण्यात आली आहे.”


हॉटेलमध्ये आग लागल्याची बातमी मिळताच कोलकाताचे महापौर फिरहाद हकीम आणि मंत्री शशि पंजा हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तसेच कोलकाताच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या घटनेची माहिती घेतली आहे. या घटनेनंतर हॉटेल मालक फरार झाला आहे. या आगीच्या घटनेनंतर केंद्रीय मंत्री आणि पश्चिम बंगाल भाजपचे अध्यक्ष सुकांता मजूमदार यांनी राज्य सरकारकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

काँग्रेसची टीका

पश्चिम बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष सुभंकर सरकार यांनी या घटनेवरून कोलकाता महानगरपालिकेवर जोरदार टीका केली आहे ‘ही घटना अत्यंत दुःखद आहे. अनेक लोक अजूनही इमारतीत अडकले आहेत. या ठिकाणी सुरक्षेची कोणतीही व्यवस्था नव्हती. महानगरपालिका काय करत आहे, हे मला समजत नाही.’ असा घणाघात सुभंकर सरकार यांनी केला.