
पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेचे माजी प्रमुख लेफ्टनंट जनरल असद दुर्रानी यांनी एका लेखात पाकिस्तानची पोल खोल केली आहे. त्यांनी लिहिलं आहे की, पाकिस्तान हा पूर्णपणे विभागलेला देश आहे, ज्याचं नेतृत्व कमकुवत हातात आहे आणि हा देश अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. दुसरीकडे भारताच्या पाठीशी अनेक शक्तिशाली देश उभे आहेत. त्यांनी लिहिलं, “जर मोदी सरकारने सिंधू जल करार रोखला तर पंजाब व सिंध प्रांतातील लोक युद्धापासून मागे हटतील. त्यानंतर दिल्लीला धन्यवाद पत्र लिहावं लागेल.”
असद दुर्रानी म्हणाले, “भारताच्या इस्रायलच्या समर्थनाबाबत कधीच शंका नव्हती. पण इस्रायलला मान्यता दिल्याने हे दुष्ट राष्ट्र आमच्या कधी कामी येईल, ही शक्यताही संपली आहे. पण ज्यांना असं वाटत होतं की काहीही झालं तरी सौदी अरब आमच्यासोबत राहील, त्यांचा भ्रम तुटला आहे. तरीही सौदीबाबत थोडं शंकेचं समाधान मिळू शकतं. पण सौदी अरबने भारताशी ज्या पद्धतीने व्यावसायिक संबंध प्रस्थापित केले, त्यातून आपल्याला राजकारणाचा एक मूलभूत धडा मिळतो की काहीही कायमस्वरूपी नसतं.”
वाचा: भारताच्या 3 शत्रूंनी केली पाकिस्तानशी हातमिळवणी, युद्धाच्या परिस्थितीत समर्थन देण्याची घोषणा
पाकिस्तान सरकारवर ISI च्या माजी प्रमुखांचा हल्ला
असद दुर्रानी म्हणाले, “जे अरब देश पॅलेस्टाईनच्या मदतीसाठी पुढे गेले नाहीत, ते अरब देश पाकिस्तानच्या मदतीसाठी का येतील आणि आमच्यासाठी अब्जावधी डॉलर्स (भारताशी व्यापार) का पणाला लावतील?” याशिवाय, त्यांनी पाकिस्तानवर टोमणा मारत म्हटलं, “सौदी अरब आमची कदर करणार नाही, कारण काही डॉलर्समध्ये आम्हाला पुन्हा विकत घेतलं जाऊ शकतं.” दुर्रानी यांनी प्रश्न उपस्थित करत विचारलं, पहलगामचा खटाटोप कोणी केला, याने खरंच काही फरक पडतो का? जर पाकिस्तानला कठोरपणे घेरण्याचा हेतू होता, तर गंगा विमान अपहरण (1971) च्या वेळी हे केलं जाऊ शकत होतं. ते म्हणाले, “अण्वस्त्रं ही चांगली प्रतिबंधक शक्ती आहे, पण अण्वस्त्रांच्या स्वतःच्या मर्यादा आहेत. पण सर्वात प्रभावी घटक जो कोणत्याही आक्रमकाला दूर ठेवतो, तो म्हणजे आमच्या प्रतिसादाची विश्वासार्हता, ज्यासाठी राष्ट्रीय संकल्प आवश्यक आहे. पण पाकिस्तानात असं काहीच नाही.”
ISI चे माजी प्रमुख दुर्रानी म्हणाले, “पाकिस्तानसाठी सर्वात मोठा धोका बाह्य नाही तर अंतर्गत आहे.”
पुढे ते म्हणाले, “देश आर्थिक संकट, राजकीय अस्थिरता आणि सामाजिक विभाजन यांसारख्या समस्यांशी झुंजत आहे. बलुचिस्तानसारख्या भागांत लोकांमध्ये राजकीय उपेक्षेची भावना आहे, जी असंतोषाला जन्म देते. आमचं सध्याचं नागरी-लष्करी संकट गेल्या सात दशकांतील सर्वात विभाजनकारी आहे.” दुर्रानी यांनी मान्य केलं की, पाकिस्तानात लष्कराचं राजकीय प्रकरणांमध्ये हस्तक्षेप ही वास्तविकता आहे. हे देशाच्या लोकशाहीसाठी हानिकारक आहे. ते म्हणाले, जेव्हा लोकांना असं वाटतं की सरकारला लष्कराने सत्तेत आणलं आहे, तेव्हा सरकारच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित होतात आणि पाकिस्तानातील अंतर्गत परिस्थिती आजच्या घडीला अशीच आहे.