
चीनच्या कम्युनिष्ट पार्टीच्या पोलीट ब्यूरोचे सदस्य आणि परराष्ट्र मंत्री वांग यी हे सध्या भारत दौऱ्यावर आहेत. मात्र त्यानंतर ते आपला भारत दौरा पूर्ण करून, 21 ऑगस्टला पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सहाव्या पाकिस्तान चीन-परराष्ट्र मंत्र्यांच्या धोकणात्मक संवादाचे सह -अध्यक्षत्व स्वीकारणे हा या भेटीचा प्रमुख उद्देश आहे. याबाबत पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून देखील एक अधिकृत निवेदन जारी करण्यात आलं आहे. ही भेट म्हणजे दोन्ही देशांमधील नियमित उच्चस्तरीय देवाणघेवाणीचा एक भाग आहे. प्रादेशिक आणि जागतिक बाबींमध्ये सहकार्य मजबूत करण्याच्या दिशेनं उचललेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे, असं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून या भेटीसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.
चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना पाकिस्तानचे उप पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री मोहम्मद इशाक डार यांनी पाकिस्तान भेटीचं निमंत्रण दिलं होतं, डार यांच्या निमंत्रणानंतर आता चीनचे परराष्ट्र मंत्री 21 ऑगस्टला पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या भेटीदरम्यान वांग यी हे पाकिस्तानी सैन्य आणि तेथील नागरिकांशी देखील संवाद साधणार आहेत.
या दौऱ्यामध्ये दोन्ही देशांदरम्यान द्विपक्षीय संबंध, प्रादेशिक स्थिरता आणि चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर या सारख्या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. मे महिन्यात भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठा संघर्ष निर्माण झाला होता, त्यानंतर चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांचा हा पहिलाच पाकिस्तान दौरा असल्यामुळे हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.
वांग यी यांचा हा पाकिस्तान दौरा भारत भेटीमध्ये परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्याशी चर्चा केल्यानंतर लगेचच होत असल्यानं या दौऱ्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. चीन भारतासोबत आपले संबंध मजबूत करण्यावर खरंच गंभीर आहे का? असा सवाल वांग यी यांच्या पाकिस्तान भेटीच्या पार्श्वभूमीवर उपस्थित केला जात आहे.
दरम्यान असं देखील बोललं जात आहे की, चीन सध्या दोन्ही देशांसोबत आपले संबंध चांगले ठेवण्याचा प्रयत्न करत आहे, एकीकडे चीन भारताशी जवळीक वाढून पाहात आहे, तर दुसरीकडे तो पाकिस्तानसोबतचे आपले संबंध कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.