Chirag Paswan : अशा सरकारचा भाग असल्याची लाज वाटते, चिराग पासवानांच्या वक्तव्याने सरकारची कोंडी
Chirag paswan Bihar News : बिहारमध्ये केवळ कोणीही सुरक्षित नाही, असं सरकारमध्ये सहभागी असलेल्या लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) चे अध्यक्ष चिराग पासवान यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या भूमिकेनंतर त्यांचं सगळं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या वाढत्या गुन्हेगारीमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्यातील या ढासळत्या परिस्थितीमुळे एनडीए सरकारमधील मित्रपक्ष असलेल्या एलजेपीचे (राम विलास) नेते आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान तीव्र संतापले आहेत. बिहारमधील घटनांमुळे आपण अत्यंत व्यथित झालो असून अशा सरकारचा भाग असल्याची आपल्याला लाज वाटत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
नेमकं काय म्हणाले चिराग पासवान?
एका मुलाखतीत बोलताना चिराग पासवान यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली. आज राज्यात कोणालाही सुरक्षित वाटत नाही, असे ते म्हणाले. सरकारचा एक घटक म्हणून या प्रश्नापासून पळ काढता येणार नाही. अशा महिलांवरील घटना घडत असलेल्या सरकारमध्ये असण्याची मला लाज वाटते आणि हे अजिबात खपवून घेतले जाणार नाही, असा थेट इशारा त्यांनी दिला.
एखादा मोठा निर्णय घेणार का, या प्रश्नावर बोलताना पासवान यांनी आपला संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, बिहारची प्रतिमा राष्ट्रीय पातळीवर खराब होत आहे. राज्यातील मुलींना आज असुरक्षित वाटत आहे. संध्याकाळी घराबाहेर पडताना मुलींना दोनदा विचार करावा लागतो, ही अत्यंत शोकांतिका आहे. जर हे सरकार नागरिकांना सुरक्षेची हमी देऊ शकत नसेल, तर मी ज्या सरकारचा भाग आहे ते मला अजिबात मान्य नाही.
नुकताच जमुई जिल्ह्यात एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यात काही वासनांध गुंड अल्पवयीन मुला-मुलीशी गैरवर्तन करताना दिसले होते. रस्त्यावरच मुलीसोबत लज्जास्पद कृत्य करण्यात आले. पोलिसांनी नंतर कारवाई केलेली दिसली पण मात्र, जमुईपाठोपाठ समस्तीपूर आणि बांका जिल्ह्यातूनही महिलांवरील अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. यामुळे विरोधी पक्षांनी सरकारला कोंडीत पकडले आहे. आता खुद्द सत्तेतील मित्रपक्ष असलेल्या चिराग पासवान यांनीच सरकारला घरचा आहेर दिला आहे. त्यामुळे बिहारच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून सम्राट चौधरी सरकारची अडचण वाढली आहे.