काँग्रेस खासदारांना हायकमांडचा अलर्ट! पुढचे 12 दिवस दौरे रद्द ठेवा, कधीही दिल्लीला बोलावणं येऊ शकतं, काय घडतंय?
Congress MPs Asked to Remain Available for Urgent Delhi Meetings: काँग्रेस खासदारांना पुढील 12 दिवस सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गौरव गोगोईंनी याबाबत पत्र लिहिलं आहे. दिल्लीला तातडीने बोलावण्याची शक्यता आहे.

काँग्रेस पक्षाने आपल्या खासदारांना पुढील 12 दिवसांसाठी महत्त्वाचा संदेश दिला आहे. लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई यांनी पक्षाच्या खासदारांना आपले वैयक्तिक कार्यक्रम आणि मतदारसंघातील दौरे पुढील 12 दिवसांसाठी लवचिक ठेवण्याचे आवाहन केले आहे. पक्षीय आणि संसदीय कामकाजासाठी कोणत्याही क्षणी दिल्लीत उपस्थित राहण्याची गरज भासू शकते, असे या संदेशातून स्पष्ट करण्यात आले आहे.
गौरव गोगोई यांनी खासदारांना पत्र पाठवून हा संदेश दिल्याची माहिती आहे. या पत्रात पुढील काही दिवसांत कमी वेळेत महत्त्वाचे पक्षीय किंवा संसदीय कामकाज उद्भवू शकते, असे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे खासदारांनी आपले नियोजित कार्यक्रम आखताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि दिल्लीला तातडीने प्रवास करण्याची तयारी ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, खासदारांचे वैयक्तिक कार्यक्रम किंवा मतदारसंघातील दौरे पूर्णपणे रद्द करण्याचे निर्देश देण्यात आलेले नाहीत. मात्र पुढील 12 दिवसांच्या कालावधीत गरज पडल्यास या कार्यक्रमांमध्ये बदल करता यावा, यासाठी ते लवचिक ठेवण्यास सांगण्यात आले आहे. पक्षाच्या कामासाठी अचानक दिल्लीला यावे लागू शकते, ही बाब लक्षात घेऊन खासदारांनी आपले वेळापत्रक निश्चित करावे, असा या संदेशाचा उद्देश असल्याचे दिसते.
या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या आगामी रणनीतीसंदर्भात या संदेशाला महत्त्व प्राप्त झाले आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून विविध मुद्द्यांवर सरकारला घेरण्याची तयारी सुरू आहे. गौरव गोगोई यांनी 14 नोव्हेंबर रोजी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या तारखा जाहीर न झाल्याबद्दल केंद्र सरकारवर प्रश्न उपस्थित केले होते. अधिवेशनात जनतेच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा व्हावी, अशी भूमिका त्यांनी मांडली होती.
खासदारांना देण्यात आलेल्या या नव्या संदेशामुळे काँग्रेसच्या संसदीय रणनीतीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. पुढील 12 दिवसांत पक्षाकडून कोणते महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार, खासदारांना दिल्लीत नेमके कोणत्या कामासाठी बोलावले जाणार आणि त्यामागे कोणता संसदीय कार्यक्रम असणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.