Cyclone Remal: बंगालच्या उपसागरावर ढग निर्मितीचा जबरदस्त व्हिडीओ पहा

'रेमल' चक्रीवादळ बांगलादेशच्या किनारपट्टीवर धडकल्यानंतर सात जणांनी आपले प्राण गमावले. तर लाखो लोकांना 12 तासांपेक्षा अधिक वेळ विजेशिवाय राहावं लागलं. बरीसाल, भोला, पटुआखली, सातखिरा, चट्टोग्राम यांसारख्या भागांना जोरदार फटका बसला.

Cyclone Remal: बंगालच्या उपसागरावर ढग निर्मितीचा जबरदस्त व्हिडीओ पहा
Cyclone Remal
Image Credit source: PTI
| Updated on: May 27, 2024 | 3:32 PM

पश्चिम बंगाल आणि बांगलादेश किनारपट्टी भागात ‘रेमल’ चक्रीवादळ रविवारी रात्री धडकलं. या वादळाची तीव्रता ताशी 110 ते 120 किलोमीटर असल्याची माहिती हवामान विभागाने दिली. पश्चिम बंगाल आणि बांगलादेश किनारपट्टी भागात हे वादळ धडकण्यापूर्वी बंगालच्या उपसागरावर काळे ढग पसरल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘द डेली स्टार’ने पोस्ट केलेल्या या एक मिनिटाच्या व्हिडीओमध्ये वर्तुळाच्या आकारात ढगांचा जाड थर तयार झाल्याचं आणि जोरदार वारे वाहत असल्याचं पहायला मिळत आहे. रविवारी रात्री 8.30 च्या सुमारास हे चक्रीवादळ धडकल्यानंतर उत्तरेकडे सरकण्यास सुरुवात झाली. त्याची तीव्रता सोमवारी कमी होईल, असं भारतीय हवामानशास्त्र विभागाने सांगितलं आहे.

पश्चिम बंगाल सरकारने किनारपट्टी भागाप्रमाणेच सागर बेट आणि सुंदरबन इथून एक लाखाहून अधिक नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर केलं. राज्य आपत्ती व्यवस्थापन आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) यांच्या प्रत्येकी 16 तुकड्या किनारी भागात तैनात करण्यात आले होते. पश्चिम बंगाल आणि बांगलादेश किनाऱ्यावर तसंच उत्तर बंगालच्या उपसागरात वादळी वाऱ्याचा वेग ताशी 110 ते 120 किमी होतं. सहा तासांनंतर त्याची तीव्रता कमी झाल्याचं हवामान खात्याने म्हटलंय.

पश्चिम बंगाल, ओडिशा आणि जवळपासच्या भागात रविवारी सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. यामुळे अनेक भागांत पाणी साचलं. कोलकाता इथं पावसाशी संबंधित घटनांमध्ये तीन जण जखमी झाल्याचीही माहिती समोर येत आहे. ‘रेमल’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर IMD ने सोमवारी बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. तसंच पश्चिम बंगालच्या किनारी जिल्ह्यांमध्ये आणि बांगलादेशला लागून असलेल्या गंगेच्या पश्चिम बंगालच्या पूर्वेकडील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा आहे.

27 आणि 28 मे रोजी आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोरम, मणिपूर आणि त्रिपुरामध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टीसह बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान ‘रेमल’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर IMD ने त्रिपुरामधील सिपाहिजाला आणि गुमती या दोन जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे.