VHT 2025 : मुंबईचा सलग चौथा विजय, गोव्याला 87 धावांनी नमवलं; गुणतालिकेत झाला असा बदल
विजय हजारे ट्रॉफी 2025-26 स्पर्धेत मुंबईने चौथ्या विजयाची नोंद केली आहे. मुंबईने गोव्याला 87 धावांनी पराभूत केलं आहे. या सामन्यासाठी सामनावीराचा पुरस्कार सरफराज खानला मिळाला.

विजय हजारे ट्रॉफी 2025-26 स्पर्धेत मुंबई आणि गोव्याचा संघ आमनेसामने आला होता. या सामन्यात नाणेफेकीचा कौल गोव्याच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पण हा निर्णय चुकला असंच म्हणावं लागेल. कारण या निर्णयाचा पुरेपूर फायदा मुंबईच्या संघाने घेतला. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 गडी गमवून 444 धावा केल्या. या सामन्यात सरफराज खानचा झंझावात पाहायला मिळाला. त्याने 75 चेंडूत 14 षटकार आणि 9 चौकार मारत 209.33 च्या स्ट्राईक रेटने 157 धावा केल्या. तर मुशीर खान आणि हार्दिक तामोरे यांनी अर्धशतकी केली. मुशीर खानने 66 चेंडूत 60 धावा, तर हार्दिक तामोरेने 28 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकार मारत 53 धावांची खेळी केली. यशस्वी जयस्वालने 64 चेंडूत 46 धावा केल्या. पण त्याचं अर्धशतक अवघ्या 4 धावांनी हुकलं. मुंबईने विजयासाठी दिलेल्या धावांचा पाठलाग करताना गोव्याचा डाव गडगडला. त्यामुळे या सामन्यावर पकड मिळवण्यात मुंबईला यश आलं.
विजय हजारे ट्रॉफीत गोव्याकडून आघाडीचे फलंदाजी मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. अर्जुन तेंडुलकर 24, कश्यप बखाले 21, स्नेहल कौठणकर 27 आणि सुयश प्रभूदेसाई 31 धावा करून बाद झाले. पण मधल्या फळीत ललित यादव आणि अभिनव तेजराणा यांनी डाव सावरला. अभिनव तेजराणाने 70 चेंडूत 8 षटकार आणि 5 चौकार मारत 100 धावा केल्या. तर ललित यादवने 66 चेंडूत 64 धावांची खेळी केली. दीपराज गांवकरने 28 चेंडूत 70 धावा ठोकल्या. पण गोव्याला 50 षटकात 9 गडी गमवून 357 धावांपर्यंत मजल मारता आली. गोव्याने हा सामना 87 धावांनी गमावला.
मुंबईचा या स्पर्धेतील सलग चौथा विजय आहे. मुंबईचे खात्यात 16 गुण असून नेट रनरेट हा +2.407 आहे. तर पंजाब दुसऱ्या क्रमांकावर असून 4 पैकी 3 सामन्यात विजय मिळवला असून 12 आणि +0.868 नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानावर आहे. गोव्याचा संघ तिसऱ्या स्थानावर असून 12 गुण आणि +0.098 नेट रनरेट आहे. महाराष्ट्र संघाचे 8 गुण असून चौथ्या, हिमाचल प्रदेश 8 गुणांसह पाचव्या, छत्तीसगड 4 गुणांसह सहाव्या, उत्तराखंड 4 गुणांसह सातव्या आणि सिक्कीम शेवटच्या स्थानी असून खात्यात एकही गुण नाही. त्यामुळे या स्पर्धेतील चुरस येत्या काही दिवसात वाढत जाणार आहे.
