
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीए आघाडीला ऐतिहासिक विजय मिळाला. या घवघवीत यशानंतर ओडिशाच्या दौऱ्यावर असलेले केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे आज भुवनेश्वर विमानतळावर जोरदार आणि भव्य स्वागत करण्यात आले. ओडिशाच्या विविध भागातून हजारो लोक, पक्ष कार्यकर्ते आणि समर्थक त्यांचे स्वागत करण्यासाठी विमानतळावर पोहोचले. यावेळी माध्यमांशी बोलताना धर्मेंद्र प्रधान यांनी बिहारमध्ये एनडीएच्या अभूतपूर्व विजयाबद्दल बिहारमधील जनतेचे आभार मानले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दूरदृष्टी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचे संघटनात्मक कौशल्य आणि बिहारचे लोकप्रिय मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वावर, जनतेने विश्वास दाखवला असं त्यांनी यावेळी नमूद केलं.
फुटीरतावादी राजकारण जनतेने नाकारलं
पंतप्रधान मोदी पूर्व भारताच्या सर्वांगीण विकासासाठी पूर्वोदयाची कल्पना करत आहेत, कारण पूर्व भारताच्या विकासाशिवाय देशाचा विकास शक्य नाही असं केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले. बिहारची सेवा करण्याची एनडीएला पुन्हा मिळालेली संधी ही पंतप्रधानांच्या नेतृत्वाची एक महत्त्वाची पावती आहे. देशात सध्या अस्तित्वात असलेल्या कल्याणकारी व्यवस्थेमुळे पंतप्रधान जनतेचे विश्वासू नेते बनले आहेत. काँग्रेसच्या फुटीच्या आणि नकारात्मक राजकारणाला जतनेने पूर्णपणे नाकारलं आहे, असंही ते म्हणाले.
यासोबतच, धर्मेंद्र प्रधान यांनी नुआपाडा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार जय ढोलकिया यांच्या मोठ्या विजयाबद्दल ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी आणि प्रदेश भाजप अध्यक्ष मनमोहन सामल यांचे अभिनंदन केले.
स्वागत सोहळ्यादरम्यान, ओडिशाचे पारंपारिक नृत्य आणि संगीतामुळे संपूर्ण विमानतळात उत्साही वातावरण होतं. पारंपारिक पोशाख परिधान केलेल्या कलाकारांनी घंटा, शंख आणि ढोल ताशांच्या तालावर केंद्रीय मंत्र्यांचे स्वागत केले. फुलांचे हार, जयजयकार आणि फटाक्यांच्या आवाजाने विमानतळ परिसर भरून गेला होता. त्यानंतर धर्मेंद्र प्रधान हे थेट पुरी श्रीमंदिरात गेले, त्यांनी महाप्रभूंचे दर्शन घेतले आणि त्यांचे आशीर्वाद घेतले.