Dhruv Rathee : जर्मन नागरिक भारतात आंदोलन करु शकतो का? ध्रुव राठीच्या नागरिकतेवरुन भाजप खासदाराचं गृहमंत्रालयाला पत्र
Dhruv Rathee : जर्मन नागरिक भारतात आंदोलन करु शकतो का? आंदोलनात सहभागी होण्यासाठी ध्रुव राठी भारतात आलेत. पण त्यांचा आंदोलनातील सहभाग कायदेशीर आहे का? याची चौकशी करण्यासाठी भाजप खासदाराने गृहमंत्रालयाला पत्र लिहिलं आहे.

शनिवारी सीजेपीचं आंदोलन आहे आणि या आंदोलनात युट्यूबर ध्रुव राठी देखील सामिल होत असल्यामुळे नवीन वाद सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. ध्रुव भारताचा नागरिक नसूनसुद्धा आंदोलनात सहभागी होत असल्याने वातावरण तापलं आहे. दरम्यान समोर येत असलेल्या माहितीनुसार, भाजप नेते आणि निवृत्त पोलीस अधिकारी भास्कर राव यांनी गृहमंत्रालयाला पत्र लिहिलं असून ध्रुव राठी यांचं नागरिकत्व आणि व्हिसाची स्थिती पडताळून पाहण्याची मागणी करण्यात आली आहे. भास्कर राव यांनी हे पत्र तेव्हा लिहिलं जेव्ह, ध्रुव राठी बेंगळुरू येथे झालेल्या SIR विरोधी आंदोलनात सहभागी झालेले. राव यांनी लिहिलेल्या पत्रात असा दावा करण्यात आला आहे की, ध्रुव राठी यांच्याकडे जर्मन येथील नागरिकत्व आहे. तर परदेशी नागरिक भारतात कोणत्या राजकीय आंदोलनात सहभागी होऊ शकतो का? असं देखील पत्रात विचारण्यात आलं आहे.
एवढंच नाही तर, असं देखील सांगितलं जात आहे की, राव यांनी पत्रात केलेल्या दाव्यांमध्ये, राठी हे जर्मन नागरिक असल्याचं म्हटलं आहे. याठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे आणि ती म्हणजे, सर्वकाही फक्त दाव्यांच्या आधारावर मांडलं जात आहे. याबद्दल अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. याच आधारे राव यांनी मंत्रालयाला या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती केली आहे. राठी कोणत्या आधारावर भारतात आले, हे देखील तपासलं जावं अशी मागणी राव यांनी केली; म्हणजेच त्यांनी कोणता व्हीसा घेतला होता किंवा कोणत्या इतर परवानगीच्या आधारे त्यांनी भारतात प्रवेश केला.
पत्रात एक महत्त्वाचा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे. राव यांनी मंत्रालयाला ही बाब स्पष्ट करण्यास सांगितली आहे की, भारतामध्ये एखादा परदेशी नागरिक राजकीय आंदोलनांमध्ये सहभाग घेऊ शकतो की नाही? यासोबतच, राठी यांनी त्यांच्या मागील भारत दौऱ्यांदरम्यानही अशा राजकीय कार्यक्रमांना हजेरी लावली होती का? याचीही तपासणी करण्याचं आवाहन त्यांनी अधिकाऱ्यांना केलं आहे.
भास्कर राव यांनी पत्रात संभाव्य उल्लंघनांचाही उल्लेख केला आहे. त्यांच्या मते, या प्रकरणात ‘फॉरेनर्स ॲक्ट’, व्हीसाच्या अटी आणि इमिग्रेशन नियमांचं उल्लंघन झालेलं असू शकतं. याच कारणामुळे त्यांनी मागणी केली आहे की, राठी यांच्या भारतामध्ये येण्या-जाण्याच्या नोंदी सुरक्षित ठेवल्या जाव्यात आणि त्यांची बारकाईने तपासणी केली जावी. शेवटी, राव यांनी गृह मंत्रालयाला विनंती केली आहे की, तपासात कोणत्याही प्रकारचं उल्लंघन सिद्ध झाल्यास योग्य ती कायदेशीर कारवाई केली जावी. त्यामुळे याप्रकरणी आता पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.