
इराण-इस्रायल-अमेरिका युद्धाची झळ भारतालाही बसली आहे. सध्या देशात LPGचे संकट आहे. या युद्धामुळे लोकांना अडचणी येत आहेत. भारत आपल्या 60 % गॅसची आयात करतो आणि 40 स्वतःचे उत्पादन करतो. त्यातील बहुतेक भाग कतार आणि युएईमधून खरेदी केला जातो.
अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धामुळे सगळ्या जगाला धक्का बसला आहे. मात्र भारतापर्ंत या युद्धाची झळ पोहोचली आहे. या युद्धामुळे भारतातील लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (LPG) च्या पुरवठ्याबाबत मोठं संकट निर्माण झालं आहे. भारत आपल्या गरजेच्या फक्त 40 % एलपीजीचे देशांतर्गत उत्पादन करतो तर उर्वरित गॅस हा आयात केला जातो. त्यापैकी बहुतेक भाग हाँ, सध्या ज्या प्रदेशात लढाई सुरू आहे त्या प्रदेशातून येतो. होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे पुरवठ्यावर सर्वात जास्त परिणाम झाला आहे.
इराण आणि ओमान दरम्यान स्थित होर्मुझची सामुद्रधुनी ही जगातील सर्वात महत्वाच्या ऊर्जा वाहतूक मार्गांपैकी एक आहे. जागतिक तेल आणि वायू वाहतुकीचा एक महत्त्वाचा भाग या मार्गातून जातो. 1 मार्चपासून होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे एलपीजी आयातीवर मोठा परिणाम झाला आहे.
भारतामध्ये LPG चा वार्षिक वापर अंदाजे 31.3 दशलक्ष टन आहे, ज्यापैकी सुमारे 87 % गॅस घरगुती स्वयंपाकघरांमध्ये वापरला जातो, तर उर्वरित हॉटेल आणि रेस्टॉरंट्ससारख्या व्यावसायिक वापरकर्त्यांना दिला जातो. देशाच्या गरजांचा मोठा भाग, म्हणजे सुरामे 62 %, हा आयातीद्वारे पूर्ण केला जातो. आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेने त्यांच्या इंडियन ऑइल मार्केट आउटलुक टू २०३० मध्ये म्हटलं होतं की, क्लीन कुकिंग प्रोग्राममुळे गेल्या दहा वर्षांत एलपीजी आयात जवळजवळ तिप्पट झाली आहे. 2020-21 मध्ये भारताचा एलपीजी आयातीची टक्केवारी ही 16.48 मिलियन मेट्रिक टन (MMT) होती, ती वाढून 2025-26 मध्ये 18 MMT पेक्षा जास्त झाली.
किती वाढली ग्राहकांची संख्या ?
भारतात LPGचा वापर वाढत आहे कारण अधिकाधिक लोक स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन वापरतात. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या पेट्रोलियम प्लानिंग अँड ॲनॅलिसीस सेल (PPAC) च्या आकडेवारीनुसार, 2015 ते जुलै 2025 दरम्यान ॲक्टिव्ह घरगुती LPG ग्राहकांची संख्या 1,486 लाखांवरून 3305 लाख इतकी झाली आहे, एका दशकात 120% पेक्षा जास्त वाढ आहे. सरकारने असा दावा केला की LPG कव्हरेज जवळजवळ 100 टक्के कुटुंबांपर्यंत वाढले आहे,
2016 मध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू झाली तेव्हा ते 62 टक्के इतकं होतं.
LPG कुठून आयात करतो भारत ?
भारताची LPG आयात काही देशांमध्ये केंद्रित आहे, त्यापैकी बहुतेक देश पश्चिम आशियातील आहेत. 2025 साली भारताच्या LPG आयातीपैकी कतारचा वाटा अंदाजे 34 % होता, ज्यामुळे तो देशाचा सर्वात मोठा पुरवठादार बनला. संयुक्त अरब अमिराती (UAE) ने अंदाजे 26% पुरवठा केला, त्यानंतर कुवेत (8.3%) चा क्रमांक लागतो.
गॅससाठी भारत पश्चिम आशियावर अवलंबून आहे, जो एक दीर्घकाळापासून चर्चेचा मुद्दा आहे. 2020 साली, भारताच्या एकूण LPG आयातीपैकी अंदाजे 37% कतारमधून, 16% युएईमधून आणि 11% सौदी अरेबियामधून झाली. सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि कतार एकत्रितपणे भारताच्या आयात केलेल्या एलपीजी पुरवठ्यापैकी 90% पेक्षा जास्त पुरवतात.
भारत कोणत्या देशांकडून किती LPG आयात करतो?
कतार- 34%
UAE- 26%
कुवेत-8.3%
2024-25 मध्ये किती झाली आयात ?
UAE- 40%
कतार-22%
सौदी अरेबिया -15%
कुवेत-15%
इतर-8 %
LNG आयातही वाढली
2024 -25 साली भारताची लिक्विफाइड नॅचुरल गॅस (LNG) ची आयातही वाढली आणि ती 27 मिलियन मेट्रिक टनपर्यंत पोहोचली. हे आतापर्यंतचे सर्वाधिक आकडे आहेत आणि 2011-12 साली मध्ये आयात केलेल्या 13.5 MMT दुप्पट आहे. एलपीजीप्रमाणेच, तेही बहुतेक पश्चिम आशियाई देशांमधून येतं हेच देश सध्या युद्धात अडकले आहेत.
अमेरिकेचाही वाटा आहे का ?
भारत अमेरिकेतूनही LPG आयात करतो का? या प्रश्नाचे सरकारने लोकसभेत उत्तर दिलं. केंद्र सरकारने सांगितले की इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) यांनी 2026 सालासाठी अमेरिकेच्या गल्फ कोस्टसोबत करार केले आहेत. या करारात वार्षिक 2.2 दशलक्ष टन एलपीजी आयातीचा समावेश आहे. परवडणाऱ्या , स्वस्त LPGसाठी भारत विविध पर्यायांचा शोध घेत आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) च्या अधिकाऱ्यांच्या पथकाने, गेल्या वर्षी म्हणजेच 21 ते 25 जुलै 2025 दरम्यान अमेरिकेला भेट दिली आणि प्रमुख अमेरिकन उत्पादकांशी चर्चा केली.
भारत किती करतो उत्पादन ?
भारताच्या देशांतर्गत ऊर्जेचा कणा म्हणजे अरबी समुद्रातील मुंबई हाय (पूर्वीचे बॉम्बे हाय) हे क्षेत्र आहे. सरकारी मालकीच्या ओएनजीसीद्वारे चालवले जाणारे हे क्षेत्र देशातील सर्वाधिक उत्पादक मालमत्ता आहे, जे ऑफशोअर तेल आणि वायूचा सर्वात मोठा वाटा पुरवतं. दरम्यान, बंगालच्या उपसागरातील कृष्णा-गोदावरी (केजी) खोरे हे नैसर्गिक वायूसाठी नवे फ्रंटियर बनले आहे.