
विचारांची समानता
27 जानेवारी 1991मधील ही गोष्ट आहे. त्या दिवशी मुंबईत 10 हजार स्वयंसेवकांनी आपल्या संपूर्ण गणवेशात पथसंचलन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिनावादन केलं होतं. वरळी येथील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला होता. त्यानंतर स्वयंसेवकांची ही फौज जांबोरी मैदानात गेली. तिथे त्यांनी आंबेडकरांना गार्ड ऑफ ऑनर दिला.
या प्रसंगी संघाचे प्रांत प्रचारक भिकू रामजी इदाते यांनी डॉ. आंबेडकर यांचं स्मरण करत महत्त्वाचं भाष्य केलं. आपल्या सर्वांना आता जाती, पंथ आणि भाषेच्या पलिकडे गेलं पाहिजे. राष्ट्रीय एकता निर्माण करण्यासाठी आणि त्याचा अनुभव घेण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे. जेव्हा राजकीय लोकशाहीबरोबरच सामाजिक लोकशाही प्रस्थापित होईल, तेव्हाच राष्ट्रीय नवनिर्माणाचं आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण होईल, असं भिकू इदाते म्हणाले होते.
सामाजिक लोकशाहीचा अर्थ दुसरा तिसरा काही नाही. तर सामाजिक समरसता आहे. जिथे देशवासियांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसावा. विशेष गोष्ट म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनीही अस्पृश्यता आणि शिवाशिव मिटवण्यासाठी सतत प्रयत्न केले. तसेच संघाच्या शाखांमध्ये हे प्रयत्न व्यावहारिक रुपाने साकारले. याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे 1939मध्ये पुण्यात आयोजित संघ शिक्षा वर्गात पाहायला मिळतं. त्याचे प्रत्यक्षदर्शी डॉ. आंबेडकर होते.
संघाच्या या शिक्षा वर्गात संध्याकाळच्या सत्रात डॉ. आंबेडकर आले होते. त्यावेळी तिथे डॉ. हेडगेवारही उपस्थित होते. त्यावेळी सुमारे 525 स्वयंसेवकांच्यासमोर उभे राहून हेडगेवार यांनी आंबेडकरांना सांगितलं की, यातील किती स्वयंसेवक अस्पृश्य आहेत हे पाहून घ्या. प्रत्येक रागेंत जाऊन ते म्हणाले, इथे कोणीही अस्पृश्य व्यक्तीला ओळखू शकत नाही. त्यावेळी त्यांनी आंबेडकरांना आग्रह केला की, तुम्ही स्वत: स्वयंसेवकांना विचारा. त्यावेळी आंबेडकरांनी स्वयंसेवकांना म्हटलं, जे अस्पृश्य असतील त्यांनी एक पाऊल पुढे यावं. आंबेडकरांच्या या आवाहनानंतरही कोणतीच हालचाल झाली नाही. त्यावर आंबेडकर म्हणाले, मी आधीच सांगत होतो ना. त्यावर हेडगेवार म्हणाले, संघात कुणालाही अस्पृश्य असल्याचा अनुभव येऊ दिला जात नाही. हवं तर तुम्ही उपजातींचे नाव घेऊन विचारू शकता. त्यावर आंबेडकरांनी चर्मकार, महार, मांग आणि मेहतर सारख्या जातींची नावे घेऊन पुढे येण्यास सांगितलं. त्यानंतर लगेचचं सुमारे 100 स्वयंसेवकर एकसाथ पुढे आले.
डॉ. आंबेडकरांचे एक सहकारी साळुंके यांनी ‘आमचे साहेब’ हे पुस्तक लिहिलंय. त्यात हे संदर्भ आढळतात. या पुस्तकात ते म्हणतात की, पुण्यात परम पूज्यनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशवर बळीराम हेडगेवार यांची भेट श्री. भाऊसाहेब गडकरी यांच्या बंगल्यावर झाली. तेव्हा भाऊसाहेब अभ्यंकर हे सर्वांना संघाच्या समर कॅम्पमध्ये भेटीसाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी घेऊन गेले. त्यावेळी आंबेडकरांनी सैन्य शिस्तबद्धता आणि संघटनेवर प्रदीर्घ चर्चा केली. सर्व प्रशिक्षणार्थींना संबोधित करत मार्गदर्शनही केलं. डॉ. हेडगेवार यांच्या नंतर संघाचे द्वितीय सरसंघचालक गुरुजी माधव सदाशिवर गोळवलकर यांनीही या गोष्टीकडे विशेष लक्ष दिलं. त्यांनी आपल्या आयुष्यात सामाजिक लोकशाहीच्या विस्तारासाठी पाहिजे ते प्रयत्न केले. त्यामुळेच आंबेडकरांच्या 73 व्या जयंतीनिमित्त स्मृती विशेषांक काढायचा होता तेव्हा गुरुजींनी एक मार्मिक संदेश लिहिला. त्यांनी आंबेडकरांना वंदनीय म्हणून संबोधित केलं. आंबेडकरांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करणं हे माझं स्वाभाविक कर्तव्य आहे, असं त्यांनी लिहिलं होतं. त्यांनी समाजातील अस्पृश्यतेसह संबंधित रुढींवर कठोर प्रहार केला. समाजाला नवीन समाजरचना करण्याचं आवाहन केलं. त्यांचं हे कार्य असामान्य आहे. त्यांनी आपल्या देशावर मोठे उपकार केले आहेत. हे उपकार इतके मोठे आहेत की त्यातून ऋणमुक्त होणं कठिण आहे, असं गुरुजींनी लिहिलं होतं.
सामाजिक समरसतेसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि डॉ. आंबेडकर यांच्या अनेक विषयांवर एकमत राहिलं आहे. जसं की, भगवा ध्वज राष्ट्रध्वज करण्याचा प्रस्ताव, संस्कृतला राजभाषा घोषित करण्याची मागणी, अनुच्छेद 370 ला विरोध… या सर्व विषयांवर दोघांध्ये कोणतेही मतभेद नव्हते. भाषावार प्रांत रचनेच्या विरोधकांमध्ये जे दोन नावे अग्रणी होते, त्यात गुरुजी आणि डॉ. आंबेडकरांचं नाव सामिल आहे. इतकेच नाही तर राज्य पुनर्गठनाच्या बाबत डॉ. आंबेडकरांची ‘युनिट्स’ची संकल्पना ही दीनदयाल उपाध्याय यांच्या ‘जनपद’च्या संकल्पनेशी मिळतीजुळतीच आहे.
एकमेकांशी संपर्क
1991 हे वर्ष डॉ. आंबेडकरांचं जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरं करण्यात आलं. या निमित्ताने संघाने देशभरात अनेक कार्यक्रमांचं आयोजन करून आंबेडकरांच्या विचारांना आणि जीवन स्मृतींना उजाळा दिला. 13 एप्रिल रोजी डॉ. आंबेडकरांच्या जन्मशताब्दीच्या पूर्व संध्येला मुंबईच्या शिवाजी पार्कवरील एका मोठ्या जनसभेचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात भाजपचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी तसेच संघाचे सरकार्यवाह प्रा. राजेंद्र सिंह (रज्जू भैय्या) यांनी उपस्थित राहून आंबेडकरांना अभिवादन केलं.
अशा प्रकारे आंबेडकरांचं स्मरण करण्याची ही काही पहिली किंवा शेवटची वेळ नव्हती. वास्तवात जेव्हा जेव्हा संधी मिळाली, संघाने त्यांचे कार्य आणि प्रयत्नांचं कौतुकच केलं. त्याचं एक उदाहरण म्हणजे, 14 एप्रिल 1983 रोजी डॉ. आंबेडकरांच्या जयंतीचं औचित्य साधून संघाने सामाजिक समरसता मंचाची स्थापना केली. योगायोग म्हणजे त्याच वर्षी वर्ष प्रतिपदाही आली. हा दिवस म्हणजे संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांचा जन्म दिवस. अशा प्रकारे ही तिथी संघ आणि आंबेडकरांच्या विचारधारेला जोडणारा एक प्रतिकात्मक क्षण बनला.
या प्रतिकात्मक क्षणाच्या व्यतिरिक्त अनेक प्रसंगी आंबेडकर आणि हेडगेवार यांची प्रत्यक्ष भेट झाली. 1939 मध्ये पुण्यातील शिक्षा वर्गाचा उल्लेख आधीच केला आहे. पण त्यापूर्वी म्हणजे 1935 मध्ये आंबेडकरांनी संघ शिबिराचं अवलोकन केलं होतं. हे शिबीरही पुण्यातचं झालं होतं. या दौऱ्याचं विवरण एच. व्ही. शेषाद्री आणि दत्तोपंत ठेंगडी यांनी लिहिलेल्या ‘एकात्मतेचे पुजारी-डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या पुस्तकात वाचायला मिळतं. त्यानंतर वकिलीच्या कामासाठी डॉ. आंबेडकर दापोलीत (महाराष्ट्र) आले होते. तिथेही त्यांनी संघ शाखांची पाहणी केली होती. त्यानंतर 1937 मध्ये कन्नड शाखे (महाराष्ट्र)च्या विजयादशमी उत्सवावेळीही आंबेडकरांनी आपली भूमिका स्वयंसेवकांसमोर मांडली होती.
डॉ. हेडगेवार यांच्या निधनानंतर आंबेडकरांचा संघाशी प्रत्यक्ष संपर्क राहिला नाही. जर संपर्क झाला असेल तर त्याचे पुरावे उपलब्ध नाहीत. हां, एक गोष्ट आहे की, महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर श्रीगुरूजींनी दिल्लीत डॉ. आंबेडकर यांची भेट घेतली होती. या भेटीचा उल्लेख दत्तोपंत ठेंगडी यांच्याशिवाय धनंजय कीर यांनी आपल्या ‘डॉ. आंबेडकर: लाइफ अँड मिशन’ या पुस्तकात केला आहे. तथापि, दोन्ही लेखकांनी या भेटीतील चर्चेचा कोणताही तपशील पुस्तकात दिला नाही. मात्र, दत्तोपंत ठेंगडी आणि त्यांच्या ‘डॉ. आंबेडकर आणि सामाजिक क्रांतीची यात्रा’ या पुस्तकात या भेटीचा उल्लेख करताना संघावर घालण्यात आलेल्या बंदीबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचा उल्लेख केला आहे.
डॉ. आंबेडकरांच्या प्रमुख अनुयायांमध्ये वामनराव गोडबोले आणि पंडित रेवाराम कवाडे ही दोन नावे महत्त्वाची होती. यापैकी पंडित रेवाराम कवाडे यांना नागपूरच्या संघ शिक्षा वर्गाच्या तृतीय वर्षाच्या समारोप कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून बोलावण्यात आलं होतं. रेवाराम कवाडे यांनी हे निमंत्र स्वीकारलं आणि ते कार्यक्रमाला आले होते. ‘डॉ. आंबेडकर आणि सामाजिक क्रांतीची यात्रा’ या पुस्तकात याचा उल्लेख आलेला आहे. याच पुस्तकात 1953मध्ये मोरोपंत पिंगळे, बाबासाहेब साठे आणि प्राध्यापक ठाकर यांनी औरंगाबादमध्ये डॉ. आंबेडकरांची भेट घेतली होती, याचा उल्लेख आहे. तेव्हा आंबेडकरांनी संघाबाबतची विस्तृत माहिती घेतली. जसं की संघाच्या किती शाखा आहे? संख्या किती आहे? ही माहिती घेतल्यावर आंबेडकर पिंगळे यांना म्हणाले की, मी तुमची ओ.टी.सी. पाहिली आहे. तेव्हा तुमची जी शक्ती होती, ते पाहता इतक्या वर्षात जी प्रगती व्हायला हवी होती, ती झालेली नाहीये. आता प्रगती अत्यंत धीमी दिसतेय. माझा समाज इतके दिवस वाट पाहण्यास तयार नाहीये.
दत्तोपंत ठेंगडी यांचीही डॉ. आंबेडकर यांच्यासोबत चर्चा झाली होती. ठेंगडी म्हणतात, धर्मांतराच्या (बौद्ध धर्म स्वीकारण्याच्या) काही दिवस आधी मी त्यांनी विचारलं होतं, पूर्वीच्या काळात काही अत्याचार झाले, ठिक आहे. परंतु, आता आम्ही तरुण लोक जे काही गुणदोष राहिले असतील त्याचं प्रायश्चित करून नवीन समाज रचना घडवण्याचं काम करत आहोत. ही गोष्ट तुमच्या लक्षात आलीय का? त्यावर आंबेडकर म्हणाले, तुमच्या म्हणण्याचा अर्थ संघाशी आहे? पुढे ते म्हणाले की, तुम्हाला असं वाटतं का की मी याबाबत विचार केला नाही? संघ 1925मध्ये स्थापन झाला. आज तुमची संग्या 27-28 लाख आहे, असं मानू. एवढ्या लोकांना एकत्र करण्यासाठी तुम्हाला 27-28 वर्ष तर लागली असेल. तर या हिशोबाने संपूर्ण समाजाला एकत्र करण्यासाठी तुम्हाला किती वर्ष लागेल?
हा काही मतभेदाचा विषय नव्हता. वास्तविक डॉ. आंबेडकरांना आपल्या जीवनकाळातच सामाजिक परिवर्तन घडलेलं पाहायचं होतं. त्यामुळेच आपल्या आयुष्याच्या शेवटच्या काळात ते अत्यंत अधीर आणि तात्काळ परिणाम मिळण्याची अपेक्षा बाळगून होते. तर, संघाची एक विशिष्ट कार्यशैली आहे, ज्यात कोणतंही लक्ष्य गाठण्यासाठी कोणताही शॉर्टकट वापरला जात नाही. तर, ठोस, क्रमबद्ध आणि दीर्घकालिक परिश्रमाच्या माध्यमातून कार्य करण्याची परंपरा विकसित करण्यात आली आहे.
एक महत्त्वाचं वास्तव हे सुद्धा आहे की, 1954मध्ये भंडारा लोकसभा पोटनिवडणुकीची घोषणा झाल्यावर तिथून निवडणूक लढण्याचा आंबेडकरांनी निर्णय घेतला. या संदर्भात त्यांच्या शुभचिंतकांची एक प्राथमिक बैठक झाली. त्यात दत्तोपंत ठेंगडीही होते. ठेंगडी यांच्या मतानुसार, भंडरा जिल्ह्याच्या स्वयंसेवकांनी डॉ. आंबेडकरांच्या निवडणुकीचा प्रचारही केला होता. पण दुर्देवाने आंबेडकर पराभूत झाले होते.
– देवेश खंडेलवाल (लेखक ज्येष्ठ विचारवंत आहेत. गेल्या 15 वर्षापासून खंडेलवाल हे संशोधन क्षेत्रात आहेत. त्यांनी डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी शोध प्रतिष्ठान, माखनलाल चतुर्वेदी राष्ट्रीय पत्रकारिता विद्यापीठ, एकात्म मानवदर्शन शोध आणि विकास प्रतिष्ठान, विचार विनिमय केंद्र, प्रसार भारती आणि झी न्यूज आदी प्रतिष्ठीत संस्थांसोबत संशोधन कार्य केलं आहे. त्याशिवाय त्यांनी MyGov इंडियामध्ये डेप्युटी जनरल मॅनेजर म्हणून सेवा दिली आहे. देवेश खंडेलवाल यांनी महाराजा हरी सिंह आणि श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्यावर दोन पुस्तकांचं लेखन केलं आहे.)