उतराखंडमध्ये ढगफुटी झाल्याने अनेक लोकं बेपत्ता, काहींचे मृतदेह सापडले

उत्तराखंडमध्ये पावसाचा जोर कायम आहे. हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. दरम्यान झालेल्या ढगफुटीमुळे अनेक ठिकाणी भूस्खलन झाले आहे. त्यामुळे बरेच जण बेपत्ता आहेत. ३०० लोकं अडकले आहेत, तर ५००० लोकांना सुखरुप ठिकाणी हलवण्यात आले आहे. अनेकाचं मृतदेह सापडले आहेत,

उतराखंडमध्ये ढगफुटी झाल्याने अनेक लोकं बेपत्ता, काहींचे मृतदेह सापडले
| Updated on: Aug 03, 2024 | 6:23 PM

उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. हरिद्वार, डेहराडून, टिहरी, रुद्रप्रयाग आणि नैनितालमध्ये आतापर्यंत पावसामुळे 16 जणांचा मृत्यू झाला आहे. १ ऑगस्टच्या रात्री मुसळधार पावसाने भूस्खलन झाल्याने आणि ढगफुटी झाल्यावे केदारनाथ येथे पायी मार्गावर येणारे 5 हजारांहून अधिक भाविक अडकून पडले होते. अडकलेल्या 5 हजार भाविकांची सुटका करण्यात आलीये. सुटका करण्यासाठी चिनूक आणि एमआय-17सह 7 हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली. अत्यंत खराब हवामानामुळे केदारनाथ दोन दिवसांपासून बंद आहे. येथे 300 भाविक अजूनही अडकून पडले आहेत. राज्यात 48 तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. इतकंच नाही तर अतिवृष्टीमुळे मध्य प्रदेशातील 6 जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला होता.

हिमाचल प्रदेशात 5 ठिकाणी ढगफुटीसदृष्य पावसामुळे 53 लोक बेपत्ता झाले आहेत. त्यापैकी 5 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे, तर 48 जण अद्याप बेपत्ता आहेत. या लोकांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ, पोलीस आणि होमगार्डचे जवानांकडून शोध मोहीम राबवली जात आहे.

शिमल्यातील बचाव पथकाला अद्याप यश आलेले नाही. येथे देखील 36 जणं बेपत्ता आहेत. त्यामुळे चिंता वाढल्या आहेत. मंडीच्या चौरघाटी येथील राजबन गावातूनही सात जण बेपत्ता झाले आहेत. त्यापैकी तीन जणांचे मृतदेह सापडले आहेत. कुल्लूच्या बागीपुलमध्येही 7 जण बेपत्ता आहेत. यापैकी एका महिलेसह 2 जणांचे मृतदेह सापडले आहेत, तर 5 जण अद्याप बेपत्ता आहेत.

एनडीआरएफने वीज प्रकल्पात अडकलेल्या ३३ कामगारांना सुखरूप बाहेर काढले. या ठिकाणी बचावकार्यासाठी 18 जणांचे पथक पोहोचले होते.

वायनाडमधील मृतांची संख्या 334 वर

केरळमधील वायनाडमध्ये 29 जुलै रोजी झालेल्या भूस्खलनात मृतांचा आकडा आता 334 वर पोहोचला आहे. 130 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर 240 हून अधिक लोक अजूनही अद्याप बेपत्ता आहेत. हवामान खात्याने वायनाडमध्ये देखील पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. आपत्ती व्यवस्थापन पथकाने पुन्हा काही ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका व्यक्त केला आहे.