
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावला आहे, अमेरिकेमध्ये भारतीय वस्तुंवर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावण्यात आला आहे. याचा काही प्रमाणात भारताला फटका बसण्याची शक्यता आहे. 28 ऑगस्टला भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्यात आला. त्याच दिवशी भारतीय सी फूड कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली होती. सी फूड कंपन्यांच्या शेअर्समध्ये 11 टक्क्यांपर्यंत घसरण झाली. कारण भारत हा अमेरिकेमध्ये सर्वात मोठा झिंगा निर्यातदार देश आहे. भारतातून मोठ्या प्रमाणात झिंग्यांची अमेरिकेत निर्यात होते. आता मोठी बातमी समोर येत आहे, डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या टॅरिफचा भारताला आणखी एक मोठा दणका बसला आहे.
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयामध्ये मोठी घसरण पहायला मिळत आहे. शुक्रवारी रुपयामध्ये मोठी घसरण झाली आहे, रुपयामध्ये घसरण होऊन रुपया प्रति डॉलर 87.9650 वर पोहोचला आहे. अमेरिकेनं भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे, त्यामुळे सध्या गुंतवणूकदारांमध्ये घबराटीचं वातावरण असून, त्यामुळे रुपयावर परिणाम झाल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.
मात्र रुपया फक्त डॉलरच्या तुलनेतच घसरला नाहीये, तर तो चीनची करन्सी असलेल्या युआनच्या तुलनेत देखील घसरला आहे. रुपयाची सध्याची किंमत 12.33 प्रति युआन एवढी आहे. या आठवड्यात युआनच्या तुलनेत रुपयामध्ये 1.2 टक्क्यांची घसरण झाली आहे, तर गेल्या महिनाभरात रुपयामध्ये ए 1.6 टक्के एवढी घसरण झाली आहे, तर गेल्या चार महिन्यामध्ये युआनच्या तुलनेत भारतीय रुपया तब्बल 6 टक्क्यांनी घसरला आहे.
अर्थशास्त्रज्ञांच्या मते भारतीय वस्तुंवर 50 टक्के टॅरिफ लावण्यात आला आहे, तर दुसरीकडे चीनच्या वस्तुंवर अजूनही 30 टक्के टॅरिफ आहे. युआनच्या तुलनेत रुपयामध्ये सुरू असलेली घसरण ही टॅरिफमधील फरक दाखवत असल्याचं मत आयडीएफसी फर्स्ट बँकेचे अर्थतज्ज्ञ गौरा सेन गुप्ता यांनी रॉयटर्सशी बोलताना व्यक्त केलं आहे. याचा भारताला काही अंशी चीनसोबत ज्या उत्पादनाबाबत अमेरिकेत निर्यातीसंदर्भात भारताची स्पर्धा आहे, तिथे होऊ शकतो असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं आहे.