कुठेही सुरू होतात ! फ्लाईटमध्ये पती-पत्नी कचाकचा भांडले, विमानाचं थेट इमर्जन्सी लँडिंग

फ्लाइटमध्ये गैरवर्तन आणि सहप्रवाशांशी वाईट वर्तन केल्याच्या अनेक बातम्या आपण ऐकल्या असतील. मात्र म्युनिचहून येणाऱ्या फ्लाईटचं एका भांडणामुळे इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं

कुठेही सुरू होतात ! फ्लाईटमध्ये पती-पत्नी कचाकचा भांडले, विमानाचं थेट इमर्जन्सी लँडिंग
| Updated on: Nov 29, 2023 | 3:14 PM

नवी दिल्ली | 29 नोव्हेंबर 2023 :  फ्लाइटमध्ये गैरवर्तन आणि सहप्रवाशांशी वाईट वर्तन केल्याच्या अनेक बातम्या आपण ऐकल्या असतील. मात्र म्युनिचहून येणाऱ्या फ्लाईटचं एका भांडणामुळे इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. भर विमानातच पती आणि पत्नी एकमेकांशी एवढे भांडायला लागले की सगळे प्रवासी हक्काबक्का झाले. दोघांचं भांडण एवढं वाढलं की हळूहळू ते हाणामारीपर्यंत पोहोचलं. फ्लाइटमधील वातावरण अगीदच बिघडल्यावर मात्र दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विानतळावर (IGI) इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. LH772 लुफ्थांसाचे हे विमान म्युनिचहून थायलंडची राजधानी बँकॉकला जात होते.

भांडणानंतर दिल्लीच्या दिशेने वळवले विमान

एएनआयने दिलेल्या बातमीनुसार, म्युनिचहून बँकॉकला जाणाऱ्या विमानात पती-पत्नीचे भांडण सुरू झाले. मात्र थोड्या वेळातच त्यामुळे एवढा गोंधळ सुरू झाला की अखेर ते विमान दिल्लीच्या दिशेने वळवण्यात आले. एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) ला ही बातमी मिळताच सुरक्षा कर्मचारी विमानतळावर पोहोचले आणि फ्लाइटचे दरवाजे उघडण्याची वाट पाहू लागले, अशी माहिती दिल्ली विमानतळाच्या सूत्रांनी दिली.

याआधी ते विमान पाकिस्तानमध्ये उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र तेथील एअरपोर्ट ॲथॉरिटीने या लँडिंगसाठी परवानगी नाकारल्याने अखेर हे विमान दिल्लीच्या दिशेने वळवून तेथे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.

 

भांडण कशावरून झालं, कुणालाच माहीत नाही

मात्र या विमानाच्या इमर्जन्सी लँडिंगसाठी कारणीभूत ठरलेलं पती-पत्नीचं ते भांडण कशावरून झालं, ते काही अद्याप समजलेलं नाही. भांडणारे ते पती-पत्नी कुठले रहिवासी आहेत, एवढे कचाकचा का भांडत होते, हे कोणालाच माहीत नाही. मात्र फ्लाइट खाली उतरल्यानंतर त्या जोडप्यापैकी पुरूषाला विमानातून खाली उतरवण्यात आले आणि सुरक्षा रक्षकांच्या ताब्यात देण्यात आले, असे समजते. दरम्यान, यासंदर्भात लुफ्थांसा एअरने अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.