राहुल गांधींच्या विमानात तांत्रिक बिघाड

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:07 AM, 26 Apr 2019

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन विमानातील व्हिडीओ शेअर करुन, यासंदर्भात माहिती दिली.

राहुल गांधी यांच्या आज बिहारमधील समस्तीपूर, ओरिसातील बालसोर आणि महाराष्ट्रातील संगमनेर येथे नियोजित सभा आहेत. मात्र, या सभांना आता राहुल गांधी उशिरा पोहोचण्याची शक्यता आहे. त्याबद्दल राहुल गांधी यांनी ट्विटवरुन दिलगिरीही व्यक्त केली आहे.

“पाटण्याला विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने आम्हाला दिल्लीला परतावं लागत आहे. समस्तीपूर (बिहार), बालसोर (ओरिसा) आणि संगमनेर (महाराष्ट्र) येथील सभांना उशिरा पोहोचेन. त्याबद्दल सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो.”, असे राहुल गांधी यांनी ट्विटवरुन सांगितले.

राहुल गांधी यांची महाराष्ट्रात संगमनेर येथे नियोजित सभा आहे. शिर्डीचे काँग्रेस उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी संगमनेरमध्ये सभा घेणार आहेत.

राहुल गांधी हे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असून, देशभरात निवडणुकीच्या प्रचारासाठी ते फिरत आहे. लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून आणि त्याआधीही राहुल गांधी संपूर्ण देशभरात फिरुन प्रचार करत आहेत. रोज सभा, मोर्चे, संवाद कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमांमधून राहुल गांधी लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.