
मध्य प्रदेशमधील दमोह जिल्ह्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका कथित बनावट डॉक्टरने 7 रुग्णांवर शस्त्रक्रिया केली आहे. यात या सातही रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एका खासगी मिशीनरी रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. या कथित बनावट डॉक्टरचे नाव नरेंद्र विक्रमादित्य यादव असून तो त्याचं नाव बदलून येथे डॉक्टर असल्याचे भावसत होता. हा प्रकार समोर आल्यानंतर आता सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नरेंद्र विक्रमादित्य यादव नावाची ही व्यक्ती मी मूळचा ब्रिटनचा असून माझे नाव डॉ. एन जॉन केम असे आहे, असे सांगत होता. रुग्णावर उपचार करण्यासाठी त्याच्याकडे योग्य वैद्यकीय पात्रता नाही, असे सांगितले जात आहे. त्यानेच एकूण 7 रुग्णांवर हृदयासंबंधी शस्त्रक्रिया केली आहे. यात या रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
एका महिन्यात सात रुग्ण दगावले
नरेंद्र विक्रमादित्य यादव या व्यक्तीने ब्रिटनमधील प्रसिद्ध डॉक्टर असल्याचे सांगत ख्रिश्चन मिशनरीच्या रुग्णालयात नोकरी मिळवली. तो हृदयरोग तज्ज्ञ म्हणून येथे रुग्णांवर उपचार करत होता. नोकरी मिळाल्यानंतर त्याने अनेक रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या. नरेंद्र यादव याने ज्या-ज्या रुग्णांवर शस्त्रक्रिया केली, त्या सर्वांचाच नंतर मृत्यू झाला. एकूण 7 रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यानंतर डॉक्टरच्या वैद्यकीय शिक्षणाबाबत चौकशी करण्यात आली. या चौकशीत या व्यक्तीचे नाव एन जॉन केन नसून नरेंद्र यादव असे समोर आले.
दरम्यान, दमोह जिह्याच्या बाल कल्याण समितीचे अध्यक्ष दीपक तिवारी यांनी या तथित डॉक्टरवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. अधिकृतपणे एकूण 7 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. पण प्रत्यक्ष मात्र मृतांचा आकडे यापेक्षा जास्त आहे, असं त्यांनी म्हटलंय.
दरम्यान, हा प्रकार समोर आल्यानंतर प्रशासनाकडून याची चौकशी केली जात आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांनी सांगितल्यानुसार या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. ब्रिटनमधील एका डॉक्टराच्या नावशी मिळते-जुळते नाव धारण करत या व्यक्तीने बनावट कागदपत्रे काढून घेततली होती. या आरोपीवर हैदराबादमध्येही एक गुन्हा दाखल आहे.
दरम्यान, ही घटना समोर आल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. रुग्णालय प्रशासनाने या कथित डॉक्टरच्या कागदपत्रांची व्यवस्थित चौकशी का केली नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात असून कथित डॉक्टरवर कठोरातील कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.