लंडनमधील डॉक्टर असल्याची बतावणी करत बनला हार्ट सर्जन, केल्या 15 शस्त्रक्रिया, सात जणांचा मृत्यू, धक्कादायक सत्य उघड

Crime News:राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तीन सदस्यीय तपास पथक निर्माण केले आहे. ते 7 ते 9 एप्रिल दरम्यान दमोह येथे पोहचणार आहेत. आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांनी ट्विट करून त्याला दुजोरा दिला.

लंडनमधील डॉक्टर असल्याची बतावणी करत बनला हार्ट सर्जन, केल्या 15 शस्त्रक्रिया, सात जणांचा मृत्यू, धक्कादायक सत्य उघड
बोगस डॉक्टर नरेंद्र यादव या रुग्णालयात होतो...
Image Credit source: टीव्ही 9 भारतवर्ष
| Updated on: Apr 06, 2025 | 3:32 PM

Crime News: डॉक्टर लंडनमधील आहे. ब्रिटनमध्येच शिक्षण झाले आहे. चांगले हार्ट सर्जन आहे, असा प्रचार करत एका बोगस डॉक्टराने एक, दोन नव्हे तब्बल १५ ह्रदयाचा शस्त्रक्रिया केल्या. त्यानंतर शस्त्रक्रिया केल्यावर एक, एक करत सात जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर डॉक्टरावर संशय निर्माण होऊ लागला. मग चौकशी समिती बसली. त्यानंतर चौकशी समितीच्या तपासणीतून जे उघड झाले ते धक्कादायक आहे.

डॉ एन. जॉन केम हा मध्य प्रदेशातील दमोह येथील ख्रिश्चिन मिशनरी रुग्णालयात कार्यरत होता. गेल्या अडीच महिन्यात त्याने १५ शस्त्रक्रिया केल्या. त्याने विदेशातून शिक्षण घेतल्याचा दावाही खोटा निघाला. त्याचे नावही खोटे निघाले. त्यांच्याकडे कोणतीही वैद्यकीय शाखेची पदवी नव्हती. त्या व्यक्तीचे खरे नाव नरेंद्र यादव आहे. नरेंद्र यादव हा ठग आहे.

नरेंद्र विक्रमादित्य यादव याने स्वत:ला लंडनमधील प्रसिद्ध कार्डियोलॉजिस्ट असल्याचे म्हटले आहे. त्याने ख्रिश्चिन मिशनरी रुग्णालयात नोकरी मिळवली. त्यासाठी त्याने ब्रिटनमधील प्रसिद्ध कार्डियोलॉजिस्ट प्रोफेसर एन. जॉन केम यांच्या नावाने बनावट कागदपत्रे बनवली. त्या कागदपत्रांच्या आधारावर त्याने नोकरी मिळवली.

यापूर्वी गुन्हा दाखल

नरेंद्र यादव वादात येण्याचा हा पहिला प्रसंग नाही. यापूर्वी हैदराबादमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. सन २०२३ मध्ये त्याने एक ट्विट केले होते. त्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतूक केले. फ्रॉन्समधील दंगली रोखण्यासाठी त्यांना पाठवण्यात येणार असल्याचे म्हटले. त्या ट्विटनंतर खळबळ उडाली. त्या अकाऊंटचा शोध घेतल्यावर ते अकाऊंट नरेंद्र यादव यांचे निघाले.

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तीन सदस्यीय तपास पथक निर्माण केले आहे. ते 7 ते 9 एप्रिल दरम्यान दमोह येथे पोहचणार आहेत. आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांनी ट्विट करून त्याची पुष्टी केली आहे. दरम्यान आता या प्रकरणावरून मध्य प्रदेशातील राजकारण तापले आहे. विरोधी पक्षनेते उमंग सिंगर यांनी ट्विट करून सरकार आणि प्रशासनावर प्रश्न उपस्थित केला. त्यांनी या प्रकरणाला नरसंहार म्हणत उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली. ते म्हणाले, दमोहचे हे प्रकरण केवळ सात मृत्यू नाही तर व्यवस्थेच्या मोठ्या अपयशाचा आरसा आहे. आता हे पाहायचे आहे की सरकार आणि प्रशासन चौकशी करूनच हे प्रकरण सोडणार की कठोर कारवाईही होणार?