वाळू माफियांचा हैदोस, पोलिसांवर बेछूट फायरिंग; पाच जवान जखमी

| Updated on: Oct 13, 2022 | 12:28 AM

उत्तराखंडच्या उधमसिंह नगरमध्ये मुरादाबाद येथील पोलीस आले होते. ते 50 हजारांचे इनाम जाहीर केलेल्या मायनिंग माफियाला अटक करण्याच्या तयारीत होते. याचदरम्यान पोलिसांवर गोळीबार करण्यात आला.

वाळू माफियांचा हैदोस, पोलिसांवर बेछूट फायरिंग; पाच जवान जखमी
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

उत्तराखंड : ग्रामीण भागात वाळूमाफिया आणि मायनिंग माफियांचा (Mining Mafia) मोठ्या प्रमाणावर हैदोस असतो. महाराष्ट्राप्रमाणेच उत्तर प्रदेशमध्येही अशाचप्रकारे मायनिंग माफीयांनी डोके वर काढले आहे. हे माफिया त्यांच्यावरील कारवाई धुडकावण्यासाठी वाट्टेल ते करतात, त्यांना कायद्याचा अजिबात धाक उरला नसल्याचेही अनेक घटनांमधून स्पष्ट झाले आहे. उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) घडलेल्या गोळीबाराच्या (Firing) घटनेतून याचाच प्रत्यय आला आहे.

उत्तराखंडमध्ये कारवाईसाठी आलेल्या उत्तरप्रदेशातील पोलिसांच्या ताफ्यावर मायनिंग माफीयांनी बेछूट गोळीबार केला. त्यात पाच जवान गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने संपूर्ण परिसरात प्रचंड दहशत माजवली आहे.

गोळीबारात मायनिंग माफीयाच्या साथीदाराच्या पत्नीचा मृत्यू

उत्तराखंडमध्ये कारवाईसाठी उत्तर प्रदेशचे पोलीस आले होते, याची खबर लागताच मायनिंग माफीयांनी त्यांना धडा शिकवण्यासाठी नियोजन केले. माफियाचा साथीदार असलेल्या ब्लॉक प्रमुखाने उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथून आलेल्या पोलिसांवर गोळीबार केला पोलिसांनी त्या ब्लॉक प्रमुखाच्या फायरिंगला जशास तसे उत्तर दिले.

हे सुद्धा वाचा

पोलिसांनी प्रतिउत्तरादाखल केलेल्या गोळीबारात ब्लॉक प्रमुखाच्या पत्नीचा गोळी लागून मृत्यू झाला. यादरम्यान मुरादाबाद पोलीस दलातील पाच जवान गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे पोलीस दलातील दोन जवान अजूनही बेपत्ता आहेत. त्यामुळे त्यांच्या बेपत्ता होण्यामागील गूढ वाढले आहे.

उत्तराखंडच्या उधमसिंह नगरमध्ये मुरादाबाद येथील पोलीस आले होते. ते 50 हजारांचे इनाम जाहीर केलेल्या मायनिंग माफियाला अटक करण्याच्या तयारीत होते. याचदरम्यान पोलिसांवर गोळीबार करण्यात आला.

ब्लॉक प्रमुखाच्या पत्नीच्या मृत्यूनंतर परिसरात प्रचंड तणाव

मायनिंग माफीयाचा साथीदार असलेल्या ब्लॉक प्रमुखाच्या पत्नीचा गोळीबारात मृत्यू झाल्यानंतर परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबाराच्या निषेधार्थ स्थानिक रहिवाशांनी कुंडा पोलीस ठाण्यासमोर तीव्र निदर्शने सुरू केली.

तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 74 वरील वाहतूक रोखून धरण्यात आली. यामुळे परिसरातील तणाव आणखीनच वाढत असल्याचे पाहून पोलीस यंत्रणा हाय अलर्टवर आहे. उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश अशा दोन्ही राज्यांतील पोलिसांचा फौजफाटा कुंडा पोलीस ठाण्याच्या आवारात तैनात करण्यात आला आहे.

उत्तराखंड पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंडा पोलीस ठाण्याच्या आवारात तब्बल 400 हून अधिक स्थानिक रहिवाशांचा जमाव निदर्शनाला बसला आहे. त्यांनी मुरादाबाद पोलिसांवर हत्येचा आरोप करीत कठोर कारवाईची मागणी केली आहे.