शीख दंगली प्रकरणी काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार दोषी, तब्बल 41 वर्षांनी निकाल

काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांना दोषी ठरवले आहे. आता येत्या 18 फेब्रुवारीला सज्जन कुमार यांच्या शिक्षेबाबत न्यायालय निर्णय घेणार आहे.

शीख दंगली प्रकरणी काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार दोषी, तब्बल 41 वर्षांनी निकाल
mp sajjan kumar
| Updated on: Feb 12, 2025 | 3:47 PM

माजी खासदार सज्जन कुमार यांना 1984 मध्ये शीखविरोधी झालेल्या दंगली संबंधित एका प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. शीख दंगली प्रकरणात दिल्ली न्यायालयाने नुकतीच सुनावणी केली. तब्बल 41 वर्षांनी याप्रकरणी निकाल देण्यात आला आहे. यात काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांना दोषी ठरवले आहे. आता येत्या 18 फेब्रुवारीला सज्जन कुमार यांच्या शिक्षेबाबत न्यायालय निर्णय घेणार आहे.

नेमकं प्रकरण काय?

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर मोठी दंगल उसळली होती. त्यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी दिल्लीत प्रचंड जाळपोळ, लुटमार झाली होती. 1 नोव्हेंबर 1984 रोजी दिल्लीतील राज नगर पार्ट-१ मध्ये सरदार जसवंत सिंग आणि त्यांचा मुलगा तरुणदीप सिंग यांची हत्या करण्यात आली. यावेळी ज्या जमावाने त्यांची हत्या केली, त्याचे नेतृत्व सज्जन कुमार करत होते, असा आरोप आहे. याप्रकरणी दिल्लीतील सरस्वती विहार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याआधी डिसेंबर 2018 मध्ये दिल्लीतील उच्च न्यायालयाच्या दुहेरी खंडपीठाने सज्जन कुमार यांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. दंगल आणि हिंसाचार भडकवल्याबद्दल त्यांना दोषी ठरवण्यात आले होते. याप्रकरणी ते तिहार जेलमध्ये शिक्षा भोगत आहेत. सज्जन कुमार यांच्याविरुद्ध दंगल, खून आणि दरोडा असे आरोप आहेत. भारतीय दंड संहितेच्या कलम १४७, १४९, १४८, ३०२, ३०८, ३२३, ३९५, ३९७, ४२७, ४३६, ४४० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

23 सप्टेंबर 1945 रोजी जन्मलेले सज्जन कुमार हे काँग्रेसचे मोठे नेते आहेत. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर उसळलेल्या शीखविरोधी दंगलीत त्यांना आता दोषी ठरवलं गेलं आहे. सज्जन कुमार यांच्यासह आणखी पाच जणांवर शीखविरोधी दंगलीत सहभागाचा आरोप सीबीआयने केला होता.

जगदीप सिंग काहलोन यांची प्रतिक्रिया

1984 च्या शीख विरोधी दंगली प्रकरणात काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांना दोषी ठरवण्यात आल्यानंतर दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे सरचिटणीस जगदीप सिंग काहलोन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “40 वर्षांपूर्वी शीख हत्याकांडाचे नेतृत्व करणाऱ्या सज्जन कुमार यांना दोषी ठरवण्यात आले आहे. त्यांना शिक्षा होईल. यासाठी मी न्यायालयाचे आभार मानतो. सत्तेत आल्यानंतर एसआयटी स्थापन केल्याबद्दल मी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचेही आभार मानतो. जगदीश टायटलर प्रकरणातही आम्हाला न्याय मिळेल अशी आशा आहे.” अशी प्रतिक्रिया जगदीप सिंग काहलोन यांनी दिली.