धक्कादायक! गंगा स्नान करणाऱ्या महिलेला व्हिडिओत नको त्या स्थितीत दाखवलं; प्रकरण पोलिसाकडे पोहोचलं
हरकी पेढी येथील मालवीय घाटावर गंगा स्नान करणाऱ्या महिलेच्या व्हिडिओमध्ये छेडछाड करून, तो विचित्र स्थितीत बनवून व्हायरल केल्याच्या प्रकारामुळे 'श्री गंगा सभा' कमालीची संतप्त झाली आहे. त्यांनी याप्रकरणी पोलिसांकडे तात्काळ आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे.

सोशल मीडियाच्या युगात तंत्रज्ञानाचा गैरवापर करून एखाद्याची बदनामी करण्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. अशीच एक संतापजनक घटना हरिद्वार या पवित्र शहरात घडली आहे. हरकी पेढी भागातील मालवीय घाटावर गंगा स्नान करणाऱ्या एका महिलेचा व्हिडिओ आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून आक्षेपार्ह स्थितीत करण्यात आला. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण हरिद्वारसह भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. काही उपद्रवी आणि विकृत मानसिकतेच्या व्यक्तींनी हा मूळ व्हिडिओ इंटरनेटवरून डाऊनलोड केला. त्यानंतर एआयचा वापर करून मूळ व्हिडिओमधील तिचे कपडे बदलले आणि तिला आक्षेपार्ह पद्धतीने दाखवून हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केला.
या प्रकाराची माहिती मिळताच हरिद्वारची प्रतिष्ठित संस्था ‘श्री गंगा महासभा’ आणि स्थानिक तीर्थ पुरोहित प्रचंड संतप्त झाले आहेत. हा केवळ एका महिलेच्या विनयभंगाचा विषय नसून, कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या पवित्र गंगा घाटाची आणि सनातन धर्माची बदनामी करण्याचा जाणीवपूर्वक केलेला कट असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. महासभेने या प्रकरणी उत्तराखंड पोलिसांकडे तातडीने गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी आणि फॅक्ट-चेकर्सनी याची सत्यता पडताळली असता, मूळ व्हिडिओ समोर आला. त्यामध्ये महिला पूर्ण कपड्यांमध्ये गंगेत स्नान करताना स्पष्ट दिसत आहे. यावरून हे सिद्ध झाले की, नंतर व्हायरल झालेला अश्लील व्हिडिओ पूर्णपणे बनावट होता. . हरकी पेढी हे लाखो लोकांसाठी श्रद्धेचे एक प्रमुख केंद्र आहे. परिणामी, गंगा घाटावर चित्रित केलेला आणि आक्षेपार्ह पद्धतीने फेरफार करून प्रसारित केलेल्या व्हिडिओमुळे या तीर्थक्षेत्राचे पुजारी संतप्त झाले आहेत.