सरकार देत आहे २ लाखांचा विमा केवळ २० रुपयांत! जाणून घ्या कसा ?

आजच्या काळात अपघाताच्या घटना वाढल्या असून, अनेक वेळा कुटुंबांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागते. अशा वेळी केवळ 20 रुपयांमध्ये मिळणारा 2 लाखांचा अपघाती विमा अनेकांसाठी जीवदान ठरतो. पीएम सुरक्षा विमा योजना ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी वरदान ठरत आहे. त्यामुळे आपण किंवा आपल्या कुटुंबातील सदस्य अद्यापही या योजनेचा लाभ घेत नसेल, तर आजच बँकेत जाऊन नोंदणी करा!

सरकार देत आहे २ लाखांचा विमा केवळ २० रुपयांत! जाणून घ्या कसा ?
फाईल फोटो
| Edited By: | Updated on: Jun 10, 2025 | 10:59 AM

भारत सरकारने देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. यामध्ये काही योजना विशेषतः अपघाती घटनांमध्ये मदतीसाठी सुरू करण्यात आल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) जी अत्यंत कमी प्रीमियममध्ये मोठा विमा संरक्षण देणारी योजना आहे. ही योजना केवळ 20 रुपयांमध्ये 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण देते, आणि त्यामुळे देशातील कोट्यवधी गरीब कुटुंबांना याचा फायदा होतो आहे.

काय आहे योजना?

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही एक अपघाती विमा योजना आहे. यामध्ये सहभागी झालेल्या व्यक्तीला जर कोणत्याही प्रकारच्या अपघातात मृत्यू किंवा अपंगत्व आले, तर त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून 2 लाख रुपये मिळतात. या योजनेत सहभागी होण्यासाठी केवळ 20 रुपयांचा वार्षिक प्रीमियम भरावा लागतो. हा प्रीमियम थेट बँक खात्यातून डेबिट होतो, त्यामुळे कोणतीही अतिरिक्त औपचारिकता लागत नाही.

पात्रता काय?

वय 18 ते 70 वर्षांदरम्यान असलेली कोणतीही भारतीय नागरिक या योजनेसाठी पात्र आहे.

लाभार्थ्याचे बचत खाते असणे आवश्यक आहे.

खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे.

वर्षातून एकदा, म्हणजे 31 मेपर्यंत प्रीमियम जमा करावा लागतो.

योजनेचे फायदे:

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही अत्यंत कमी प्रीमियममध्ये मोठं आर्थिक संरक्षण देणारी एक उपयुक्त योजना आहे. यामध्ये अपघातामुळे मृत्यू झाल्यास किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास विमाधारकाच्या कुटुंबाला 2 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. जर लाभार्थ्याला अंशतः अपंगत्व आले असेल, जसं की एका हाताचा किंवा पायाचा नुकसान झाला असेल, तर त्यासाठी 1 लाख रुपयांची भरपाई मिळते. यामधील सर्वात मोठा फायदा म्हणजे योजनेसाठी वार्षिक फक्त 20 रुपयांचा अत्यल्प प्रीमियम लागतो. हा प्रीमियम थेट बँक खात्यातून वजा होतो, त्यामुळे वेगळी झंझट किंवा पेपरवर्क करावा लागत नाही. ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि ग्रामीण भागातील नागरिकांसाठी विशेष लाभदायक ठरते. विमा संरक्षण असल्यानं अपघात झाल्यानंतर कुटुंबाला काही प्रमाणात तरी आधार मिळतो, त्यामुळे ही योजना आर्थिक सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे.

अर्ज कसा करावा?

या योजनेसाठी जवळच्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये संपर्क साधून अर्ज करता येतो. अनेक बँका ऑनलाइन पद्धतीनेही यासाठी सुविधा देतात. एकदा अर्ज मंजूर झाल्यावर दरवर्षी मे महिन्यात प्रीमियम आपोआप खात्यातून वजा केला जातो.

अपघातानंतर काय प्रक्रिया?

जर लाभार्थ्याचा अपघाती मृत्यू झाला किंवा अपंगत्व आले, तर त्याचे कुटुंबीय संबंधित बँकेत किंवा विमा कंपनीकडे आवश्यक कागदपत्रांसह क्लेम करू शकतात. कागदपत्रांमध्ये मृत्यू प्रमाणपत्र, अपघाताचा अहवाल, आधार कार्ड, खाते तपशील इत्यादी लागतात.