एकामागोमाग एक दोन स्फोट, दीड किमीपर्यंत आवाज, भिंती हादरल्या; पंजाबमध्ये हायअलर्ट; घातपाताचा मोठा कट?

पंजाबमधील जालंधर बीएसएफ मुख्यालय आणि अमृतसर लष्करी छावणीजवळ झालेल्या दोन स्फोटांमुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून संपूर्ण राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

एकामागोमाग एक दोन स्फोट, दीड किमीपर्यंत आवाज, भिंती हादरल्या; पंजाबमध्ये हायअलर्ट; घातपाताचा मोठा कट?
panjab blast
| Updated on: May 06, 2026 | 8:24 AM

गेल्या काही दिवसांपासून देशभरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यातच आता पंजाबमध्ये एकाच रात्री दोन वेगवेगळ्या ठिकाणी स्फोट झाल्याची घटना घडली आहे. यामुळे राज्याच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या घटनेमुळे यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. पंजाबमध्ये पहिला स्फोट जालंधर येथील सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) मुख्यालयाबाहेर झाला. तर दुसरा स्फोट अमृतसरमधील खासा भागातील लष्करी छावणीजवळ झाला. या दोन्ही घटनांमुळे सीमावर्ती भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्कूटरमध्ये अचानक स्फोट

काल मंगळवारी रात्री ८.१५ च्या सुमारास जालंधरमधील बीएसएफ पंजाब फ्रंटियरच्या मुख्यालयाबाहेर उभ्या असलेल्या एका स्कूटरमध्ये अचानक स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की परिसरात घबराट पसरली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही संबंधित स्कूटर तेथे काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याची होती, अशी माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे.

जालंधरच्या पोलीस आयुक्त धनप्रीत कौर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही स्कूटर उभी असताना अचानक तिला आग लागली. त्यानंतर अचानक स्फोट झाला. आता ही आग तांत्रिक बिघाडामुळे लागली की हा घातपात होता, याचा तपास पोलीस आणि बीएसएफचे अधिकारी संयुक्तपणे करत आहेत

जालंधरमधील घटनेनंतर अवघ्या दोन तासांत रात्री १०.३० च्या सुमारास अमृतसरच्या खासा भागातील लष्करी छावणीजवळ (Military Cantonment) दुसरा मोठा स्फोट झाला. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट अत्यंत तीव्र होता. त्याचा आवाज दीड किलोमीटर परिसरापर्यंत ऐकू आला. स्फोटाच्या धक्क्याने परिसरातील घरांच्या भिंती हादरल्या. हा लष्करी परिसर असल्याने तत्काळ लष्कराचे जवान आणि पंजाब पोलिसांनी परिसराची नाकेबंदी केली.

सुरक्षा यंत्रणांकडून तपास सुरु

या दोन्ही घटनांची माहिती मिळताच फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली. या स्फोटासाठी कोणत्या प्रकारचे स्फोटक वापरले गेले होते, याचा शोध घेतला जात आहे. अमृतसर आणि जालंधर या दोन्ही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. या दोन्ही घटनांचा काही परस्पर संबंध आहे का, याचाही शोध सुरू आहे.

दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण पंजाबमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे संशयास्पद हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. तसेच नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Follow Us