हसणं नाही, बोलणं नाही, 5 दिवस महिला कपडेही घालत नाहीत; कारण ऐकून थक्क व्हाल
हिमाचल प्रदेशातील पिणी गावात एक अनोखी परंपरा आहे. येथे महिला पाच दिवस वस्त्रहीन राहून उत्सव साजरा करतात. राक्षसांच्या हल्ल्यापासून गावाचे रक्षण करणाऱ्या लाहू घोंड देवाच्या सन्मानार्थ ही प्रथा सुरू झाली. या काळात पुरुषांनाही दारू व मांसाहारास बंदी असते. काळानुसार या प्रथेत थोडे बदल झाले असले तरी, आजही काही ग्रामस्थ याचे पालन करतात.

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. त्यामुळेच देशातील प्रत्येक राज्य आणि शहरातील मान्यता आणि परंपरा वेगवेगळ्या असतात. बाहेरच्या राज्यातून आलेल्यांना त्या प्रथा, परंपरा ऐकायला, पाहायला विचित्र वाटू शकतात. पण तिथल्या स्थानिक लोकांसाठी त्या परंपरा, प्रथा सर्वोच्च असतात. त्यामुळेच ते लोक या प्रथा, परंपरांचं पालन आयुष्यभर करत असतात. भारतात एक असं गाव आहे, ज्याची प्रथाच वेगळी आहे. विशेष म्हणजे महिलांशी संबंधित ही प्रथा आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यामागील कारण आश्चर्यकारक आहे.
पिणी असं या गावाचं नाव आहे. हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात हे गाव आहे. या गावात पाच दिवसाचा एक उत्सव असतो. हा उत्सव अत्यंत धुमधडाक्यात साजरा केला जातो. पण या पाच दिवसात गावातील महिला कपडेच घालत नाहीत. अंगावर एक चिंधीही नसते. त्यामुळे या महिला पाच दिवस घरातच कोंडून ठेवतात. या काळात त्या त्यांच्या नवऱ्यालाही भेटत नाहीत.
ना दारू, ना मटण…
या पाच दिवसात पुरुषांनाही अत्यंत संयम पाळावा लागतो. श्रावण महिन्याच्या अखेरीस हा उत्सव साजरा केला जातो. विशेष म्हणजे या पाच दिवसाच्या उत्सव काळात महिला हसत सुद्धा नाहीत. कुणाशी फारसं बोलत नाहीत. या काळात पुरुषांना दारू पिण्यास आणि मांस खाण्यास बंदी असते. असं नाही केलं तर गावावर भयंकर संकट येऊ शकतं. आमच्या आयुष्यात विचित्र समस्या निर्माण होऊ शकतात, असं या गावातील लोकांचं म्हणणं आहे.
अन् देव प्रकट झाला…
ही प्रथा कधी पासून पडली हा खरा प्रश्न आहे. अनेक रिपोर्टनुसार, ही प्रथा अनेक वर्षांपासून सुरू झाली आहे. या गावातील लोकांच्या मते, अनेक शतकांपूर्वी या गावावर राक्षस हल्ला करायचे. ते गावातील महिलांशी अत्यंत चुकीच्या पद्धतीने वागायचे. राक्षसांच्या अत्याचारांनी परिसीमा गाठली होती. त्यामुळे ‘लाहू घोंड’ नावाचा देव प्रकट झाला. त्याने भाद्रपद महिन्याच्या पहिल्याच दिवशी त्या राक्षसांचा वध करून इथल्या महिलांची इज्जत वाचवली. तेव्हापासून या गावात 5 दिवसाचा उत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू झाली. या काळात महिलांनी शृंगार केला तर राक्षस पुन्हा हल्ला करतील, अशी या गावातील लोकांची समजूत आहे.
बाहेरच्या लोकांना प्रवेश बंद
काळानुरूप या प्रथेत आता थोडा फरक पडला आहे. अनेक महिला या काळात अंगावर सुती वा पातळ कापड घालतात. काही महिला तर हा उत्सवच साजरा करत नाहीत. ही भाकड कथा असल्याचं या महिलांचं म्हणणं आहे. पण काही लोकांना ही प्रथा सुरू राहावी असं वाटत असल्याने ते या प्रथेचं पालन करतात. विशेष म्हणजे या पाच दिवसात बाहेरच्या लोकांना या गावात प्रवेश बंदी असते. तसेच बाहेरचे लोकही या काळात या गावाकडे फिरकत नाहीत.