
आज भारत देशाचा 79 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. 1947 साली याच दिवशी भारताला ब्रिटिश राजवटीतून स्वातंत्र्य मिळाले होते. हा दिवस स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आणि देशाच्या प्रगतीची आठवण म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. भारताच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील लाल किल्ल्यावर सलग 12 व्या वेळी तिरंगा फडकवला. ध्वजारोहणानंतर 21 तोफांची सलामी देण्यात आली. यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करत आहेत. यंदा नवा भारत ही स्वातंत्र्य भारताची थीम असणार आहे. ज्याचा उद्देश 2047 पर्यंत भारताला समृद्ध, सुरक्षित आणि आत्मनिर्भर बनवणे आहे.
यंदाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरातून 5000 हून अधिक विशेष पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये स्पेशल ऑलिंपिक्स 2025 चे खेळाडू, शेतकरी, युवा लेखक, स्वच्छता कर्मचारी आणि देशभरातील 85 सरपंचांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यंदा राष्ट्रगीत वाजवणाऱ्या बँडमध्ये पहिल्यांदाच अग्निवीरांचा सहभाग असणार आहे. त्यासोबतच यंदाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या यशाचा गौरवही या सोहळ्यात करण्यात येणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना आदरांजली वाहिली.
#WATCH | Prime Minister Narendra Modi pays tribute to Mahatma Gandhi at Rajghat, in Delhi, on #IndependenceDay
(Video: DD) pic.twitter.com/3ecTwDdQXB
— ANI (@ANI) August 15, 2025
लाल किल्ल्यावरील कार्यक्रमासाठी 11,000 हून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते. यामध्ये साडेसात हजारांहून अधिक जवान आणि स्नायपर यांचा समावेश होता. त्यासोबतच दिल्ली वाहतूक पोलिसांनी काही मार्गांवर बदल केले आहेत. ज्यामुळे सकाळी 4 ते 10 वाजेपर्यंत वाहतूक बंद होती. त्यासोबतच देशभरात विविध शासकीय कार्यालयांवर तिरंगी रंगाने रोषणाई करण्यात आली आहे. तसेच ठिकठिकाणी स्वातंत्र्यदिनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. पंतप्रधान मोदींनी सध्या देशाला संबोधित करत असून अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य करत आहेत. याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे.
#WATCH | Delhi: Prime Minister Narendra Modi hoists the national flag at the Red Fort. #IndependenceDay
(Video Source: DD) pic.twitter.com/UnthwfL72O
— ANI (@ANI) August 15, 2025
79 व्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यासाठी आज लाल किल्ला पूर्णपणे सजवण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करण्यापूर्वी ट्वीट करत स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. ही सुवर्णसंधी सर्व देशवासियांच्या जीवनात नवी ऊर्जा आणि स्फूर्ती घेऊन येवो, जेणेकरून विकसित भारताच्या निर्मितीला नवी गती मिळेल, अशी माझी कामना आहे. जय हिंद!, असे ट्वीट पंतप्रधान मोदींनी केले आहे.