नवी दिल्लीतील अक्षरधाम मंदिरात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा, संतांची राष्ट्रध्वजाला सलामी
कार्यक्रमादरम्यान संतांच्या हस्ते राष्ट्रध्वजास सन्मानपूर्वक सलामी देण्यात आली. यानंतर राष्ट्रगीत आणि राष्ट्रगानाचे सामुहिक गायन करण्यात आले, ज्यामुळे संपूर्ण परिसर देशभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला.

नवी दिल्लीतील स्वामिनारायण अक्षरधाम मंदिरात ७९ वा स्वातंत्र्यदिन अत्यंत श्रद्धा, देशभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी मंदिर परिसरात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच भारताची अखंडता, एकता आणि प्रगतीसाठी विशेष प्रार्थना करण्यात आली.
या सोहळ्यात संतांच्या हस्ते भारताच्या राष्ट्रध्वजास सन्मानपूर्वक सलामी देण्यात आली. यानंतर राष्ट्रगीत आणि राष्ट्रगानाचे सामुहिक गायन करण्यात आले, ज्यामुळे संपूर्ण परिसर देशभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला.
या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना सारंगपुर मंदिराचे प्रमुख प्रभारी आणि बीएपीएस ( BAPS ) संस्थेचे वरिष्ठ संत ज्ञानेश्वर स्वामीजी यांनी स्वातंत्र्यसंग्राम आणि आध्यात्मिक साधनेचा ऐतिहासिक संदर्भ सांगितला. ते म्हणाले की, दांडी यात्रेच्या वेळी जेव्हा महात्मा गांधीजींनी शास्त्रीजी महाराजांकडे पूर्ण स्वातंत्र्याचा संकल्प व्यक्त केला होता, तेव्हा शास्त्रीजी महाराजांच्या आज्ञेने योगीजी महाराजांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी सलग १८ वर्षे दररोज २५ माळांचा जप करून प्रार्थना केली होती. ही घटना राष्ट्रभक्ती आणि आध्यात्मिक निष्ठेचे अनोखे उदाहरण आहे.
ज्ञानेश्वर स्वामीजींनी पुढे म्हणाले की, देशाची खरी ताकद ही त्याच्या एकतेमध्ये आहे. स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या वीरांच्या त्यागाचे स्मरण ठेवून प्रत्येक नागरिकाने राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. विशेषतः तरुण पिढीने देशाची एकता, अखंडता आणि सांस्कृतिक मूल्ये जपण्याचे आवाहन त्यांनी केले.
या सोहळ्यात गुरुहरि महंत स्वामी महाराज यांनी सर्वांना एकता, सलोखा आणि राष्ट्रसेवेच्या भावनेने पुढे जाण्याचा आशीर्वाद दिला. त्यांनी भारताच्या निरंतर प्रगती, शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली. संतांच्या मार्गदर्शनाने आणि देशभक्तीने ओतप्रोत झालेल्या या कार्यक्रमात उपस्थित सर्व भाविक आणि संतांनी राष्ट्राप्रती समर्पण व सेवेचा संकल्प केला.