ना दुधाची विक्री, ना पॅकेटचं दूध; भारताच्या या अनोख्या गावाबद्दल माहित्ये का ?
भारतात एक असं अनोखं गाव आहे जिथे दुधाची कधीच विक्री होत नाही. या गावात कोणीही पॅकेटचे दूध विकत घेत नाही. असं का ? काय आहे खास ?

Village Where Milk Not Sold : शहरांत बहुतांश लोकं हे पॅकेटचं दूध विकत घेतात आणि ते पितात. मात्र गावांत असं नसतं, गावांमध्येही दूध खरेदी केलं जातं, पण बऱ्याच ठिकाणी पॅकेटचं दूध नसतं. तिथे लोकं दुधासाठी किटली घेऊन जातात. मात्र भारतात एक गाव असंही आहे जिथे कधीच दूध खरेदी केलं जात नाही, ना ते विकलं जातं… हो , हे खरं आहे, भारतातील या अनोख्या गावात दुधाची विक्री होत नाही, तर ते वाटलं जातं. एवढंच नव्हे तर या गावात आत्तापर्यंत कोणीच बाहेरून किंवा पॅकेटच दूध विकत घेतलेलं नाहीये. वाचून आश्चर्य वाटलं ना, पण हेच खरं आहे.
भारतातलं हे अनोख गाव तेलंगणातील आदिलाबाद जिल्ह्यात आहे. आदिलाबाद जिल्ह्यातील ग्रामीण मंडळाच्या अल्लिकोरी ग्रामपंचायतीमध्ये पोट्टमलोड्डी हे गाव येतं. विशेष म्हणजे या गावात मोजून पक्त 50 कुटुंब राहतात. पण या छोट्याशा गावात 250 हून अधिक गायी आणि शेळ्या आहेत. गावकरी त्यांना केवळ जनावरं मानत नाही, तर ते त्यांची आपल्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे काळजी घेतात. संपूर्ण गावाने तीन गुराखी नियुक्त केले असून ते या जनावरांना दररोज जनावरांना चरायला घेऊन जातात.
गरजूंना वाटलं जात दूध
सकाळी गुरांना चरण्यासाठी नेणं आणि संध्याकाळी परत घेऊन येणं, हीच इथली दिनचर्या आहे. या गावचं एक वैशिष्ट्य म्हणजे इथे गाईंपासून कितीही दूध मिळालं तर ते दूध केंद्रात नेलं जात नाही, की बाजारात जाऊन विकलंही जात नाही. जर एखाद्या घरात दूध जास्त झालं असेल तर ते गरजूंना देऊन टाकण्यात येतं, त्याचं वाटप केलं जातं.
आत्तापर्यंत कोणीच बाहेरून विकत आणलं नाही दूध
पोट्टमलोड्डी गावातील लोकांपैकी कोणीही आत्तापर्यंत एकदाही बाहेरून दूध किंवा दुधाचं पॅकेट विकत आणलेलं नाहीये. कारण जेवढ्या दुधाची गरज असेत, तेवढं दूध आधीच त्यांच्या घरात असतं. एका बाजूला दूध विकत घेणारे जग आहे, तर दुसऱ्या बाजूला दूध वाटून देणारे हे गाव आहे. आजकलाच्या जगात पशूंना केवळ उत्पन्नाचं साधन मानलं जातं, मात्र दुसरीकडे या गावात त्यांची घरातल्या सदस्यांप्रमाणे काळजी घेतली जाते. पट्टामलोड्डी गाव आजही दुधाच्या पॅकेट्सपासून आणि दुधातील भेसळीपासून दूर आहे.