
इंडिगोच्या प्रवाशांच्या मागे लागलेलं शुक्लकाष्ठ काही कमी झालेलं नसून त्यांच्या अडचणीही कमी होताना दिसत नाहीयेत. गेल्या चार दिवसापासून सतत विमान उड्डाणं रद्द होत आहेत. इंडिगोच्या विमानांची सेवा आजही डळमीच असून आत्तापर्यंत हजारो उड्डाणं रद्द झाल्याने प्रवाशांना मात्र चांगलाच फटका बसला आहे. पुण्यातही इंडिगोची आज दिवसभरातील 42 विमान उड्डाण रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यात येणारी 14 आणि पुण्याहून विविध शहरात जाणाी 28 विमान रद्द झाल्याची माहिती एयरपोर्ट अथॉरिटीकडून देण्यात आली आहे. ऑपरेशनल अडचणी हळूहळू सुधारत आहेत, परंतु 10 ते 15 डिसेंबर दरम्यानच सर्व परिस्थिती पूर्वपदावर येण्याची अपेक्षा असल्याचे सांगत कंपनीचे सीईओ पीटर एल्बर्स यांनी माफी मागितली आहे. देशभरात आज इंडिगोची 452 उड्डाणं रद्द झाली आहेत.
इंडिगोच्या संकटामुळे प्रवासी अडचणीत असून त्यांना मदत करण्यासाठी स्पाइसजेटने विशेष उड्डाणे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या संकटात स्पाइसजेटने अतिरिक्त 100 विमानं चालवण्याची घोषणा केली आहे. मात्र फ्लाईट्सच्या तिकीटांच्या दराने चांगलीच गगनभरारी घेतल्याचेही दिसून आलं. दरम्यान सरकारने या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तर रेल्वेने या संकटाच्या काळात विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. नागरी उड्डाण मंत्रालय 24 तास चालणाऱ्या नियंत्रण कक्षातून उड्डाण संचालन, अपडेट्स आणि भाडे यावर लक्ष ठेवत आहे.
पुण्यात 42 उड्डाणं रद्द
पुण्यातील इंडिगोची आज दिवसभरातील 42 विमान उड्डाण रद्द झाली आहे. पुण्यात येणारी 14 आणइ पुण्याहून इतर शहरात जाणीर 28 विमान रद्द झाल्याचे एअरपोर्ट अथॉरिटीने सांगितलं. आज चार नंतर इंडिगोच्या विमानाचं उड्डाण होणार होतं, तेव्हा उशिराने उड्डाण होणार असल्याचं सांगण्यात आलं, पण आता तर सर्व उड्डाणं रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना पुन्हा मनस्ताप सहन करावा लागणार असून त्यांना पर्यायी प्रवासाची सोय करावी लागणार आहे.
इंडिगोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गर्दी घटली
इंडिगोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गर्दी घटली आहे. आज सकाळी पण काही विमाने उशिरा उड्डाण घेणार असल्याची माहीती समोर आली आहे. काल तिकिटं रद्द करण्यासाठीप्रवाशांची मोठी धावपळ झाली होती. पण आता इंडिगोच्या काऊंटरवर गर्दी दिसत नाहीये.
प्रवासी संतापले
इंडिगोच्या फ्लाईट्स रद्द झाल्याने प्रवासी चांगलेच संतापले आहेत. विमान कंपन्यांकडून आमची लूट होत आहे. छत्तीसगड रायपूर वरुन आमचं विमानं होतं, इंडीगोची फ्लाईट रद्द झाल्याने आम्हाला रायपूर वरुन नागपूरला यावं लागलं. तिकिटाचे दर 40 ते 45 हजार रुपये आहेत असे सांगत प्रवाशांनी त्रागा व्यक्त केला.
इंडिगो ठप्प झाल्याने इतर विमान कंपन्यांच्या तिकिटाचे दर गगनाला
इंडिगोची सेवा ठप्प झाल्याने इतर विमान कंपन्यांच्या तिकिटाचे दर गगनाला भिडलेत. एअर इंडियाने नागपूर मुंबई, नागपूर दिल्ली जाण्यासाठी 25 ते 40 हजारांपर्यंत दर आकारले आहेत. – नागपूर ते कोलकाता 42 हजार, नागपूर ते पुणे 45 ते 75 हजार, नागपूर ते गोवा 42 ते 80 हजार, नागपूर ते बंगलुरु 70 हजार आणि नागपूर ते हैदराबाद 55 हजार रुपये तिकीटाचे दर आहेत. अचानक मागणी वाढल्याने एअर इंडिया कंपनीचे तिकिटाचे दर वाढवले. त्याचा फटका प्रवाशांना सहन करावा लागतोय.
कुठून किती उड्डाण रद्द ?
देशभरातही इंडिगोची अनेक विमानं रद्द करण्यात आली आहेत. दिल्लीतून एकूण 86 विमान उड्डाणं रद्द झाली. ज्यामध्ये 37 जाणाऱ्या आणि 49 येणारी विमानं आहेत. आज मुंबई विमानतळावरून इंडिगोची 109 उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत, ज्यात 51 येणारी आणि 58 जाणारी विमानं यांचा समावेश आहे. अहमदाबादमध्ये, इंडिगोच्या 19 विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत, ज्यामध्ये 7 येणारी आणि 12 जाणारी उड्डाणे आहेत. तिरुवनंतपुरममध्ये इंडिगोच्या विमानांची सहा उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
बिरसी विमानतळावरून इंडिगोची उड्डाणे रद्द, प्रवाशांचे पैसे केले परत
डीजीसीएच्या नव्या फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशनमुळे इंडिगो विमान कंपनीची देशभरातील विमानसेवा तीन दिवसांपासून कोलमडली आहे. याचा फटका गोंदिया तालुक्यातील बिरसी विमानतळावरून सुरू असलेल्या विमानसेवेला सुद्धा बसला. येथील इंडिगोची विमानसेवा शुक्रवारपासून 5 ते 9 डिसेंबरपर्यंत रद्द करण्यात आली असल्याचे कंपनीचे अधिकारी व विमानतळ प्राधिकरणाने सांगितले.