या राज्यात मेट्रो फ्री, महिला असो वा पुरुष सर्वांना मोफत सफरीचा आनंद

आपल्या राज्यात एसटीतून महिलांना अर्धे तिकीट आहे, तर दिल्लीतही महिलांना बसेसमधून प्रवास सुविधा आहेत. आता एका राज्याने तर चक्क मेट्रोमधून महिला आणि पुरुष दोघांनाही मोफत प्रवास घडवला आहे.

या राज्यात मेट्रो फ्री, महिला असो वा पुरुष सर्वांना मोफत सफरीचा आनंद
| Updated on: Jun 06, 2025 | 5:06 PM

एकीकडे मेट्रो सेवांचे जाळे महानगरांत वाढते आहे. त्यातही देशात कोलकातानंतर दिल्ली सर्वाधिक मेट्रो जाळे निर्माण झाले आहे. मुंबई आणि पुणे सारख्या महानगरात मेट्रो मार्ग जलदगतीने उभारणे गरजेचे आहे. परंतू काही शहरात तर मेट्रोचे डब्बे वाढदिवस आणि इतर समारंभासाठी भाड्याने दिले जात आहेत. आता एका राज्याने तर प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी चक्क मोफत सेवा सुरु केली आहे.

31 मे पासून मध्यप्रदेशच्या इंदूरमध्ये मेट्रोची सेवा सुरु झाली आहे. पहिल्या आठवड्याला सर्वांना मेट्रोची मोफत सफर घडवण्यात आली आहे. आतापर्यंत १ लाखांहून अधिक लोकांनी या मोफत सेवेचा लाभ घेतला आहे. रविवारपासून मात्र प्रवाशांना किमान 5 रुपये भाडे द्यावे लागणार आहे. हे भाडे 75 टक्के सबसिडी लावून ठरवण्यात आले आहे. दुसरीकडे मुंबईत मेट्रोचे किमान भाडेच 10 रुपये आहे. या पाच रुपयांच्या तिकीटात आता रविवारपासून किती प्रवासी प्रतिसाद देतात याकडे मध्य प्रदेशातील इंदूर प्रशासनाचे लक्ष लागले आहे.

मध्य प्रदेशातील क्लीन सिटी म्हणून ओळखली जाणाऱ्या इंदूर येथे ३१ मेपासून मेट्रोची सुरुवात झाली आहे. मेट्रो रेल कॉर्पोरेशनने एक आठवड्याचा शुभारंभाचा प्रवास मोफत ठेवला आहे. आता दोनच दिवस शिल्लक राहीले आहेत. रविवारपासून मेट्रोचे भाडे आकारण्यास सुरुवात होणार आहे. लोकार्पणानंतर मेट्रोतून प्रवास करण्यासाठी प्रवाशांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. दररोज मेट्रोतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे.

रविवारपासून मेट्रोचे तिकीट आकारले जाणार

इंदूर शहरातील मोफत मेट्रो प्रवासाचे दोनच दिवस शिल्लक आहेत. रविवारपासून मेट्रोचे तिकीट आकारले जाणार आहे. पाच दिवस मेट्रोचा प्रवास मोफत सुरु आहे. आतापर्यंत पाच दिवसात मेट्रोला एक लाख प्रवासी लाभले आहेत. गुरुवारी २१ हजार १७९ प्रवाशांनी मोफत प्रवासाचा लाभ घेतला आहे. मध्य प्रदेश मेट्रो रेल कॉर्पोरेशनने सुरुवातीला प्रति दिन 50 फेऱ्यांचे टार्गेट ठेवले होते., परंतू प्रवाशांची वाढती मागणी पाहून १०० फेऱ्या चालविण्यात येत आहेत.

केवळ 5.9 किमी लांबीचा मार्ग सुरु

सुपर कॉरिडॉरवर 5.9 किमी लांबीचा मार्ग सुरु करण्यात आल्यानंतर आता एअरपोर्ट क्षेत्रात रेल्वे ट्रॅकची बांधणी वेगाने केली जात आहे. एअरपोर्ट अथॉरिटीकडून मर्यादित ठिकाणी ड्रोन सर्व्हेक्षणची अनुमती मिळाली आहे. गांधी नगर ते सुपर कॉरिडॉर मार्गे बापट, विजय नगर, रेडिसन आणि रोबोट स्क्वेअरपर्यंतच्या १७.५ किमी लांबीच्या एलिव्हेटेड कॉरिडॉरवर काम सुरू आहे. पुढे, गांधी नगर ते विमानतळापर्यंतचा मेट्रो मार्ग भूयारी असणार आहे. पहिल्या टप्प्यात एकूण ३१.३२ किमी लांबीचा कॉरिडॉर बांधला जाणार आहे. मेट्रो कंपनी विमानतळासमोर एक भूयारी स्थानक बांधत आहेत. या स्थानकासाठी जमीन देण्याचा करार झाला आहे. येथे सॉईल टेस्टींगचे प्राथमिक काम सुरू झाले आहे.

योजनेप्रमाणे सुपर कॉरिडॉरपासून विमानतळापर्यंत मेट्रो कॉरिडॉर बांधला जाणार आहे. या मेट्रो मार्गाचा काही भाग एलिव्हेटेड असेल आणि काही भाग भूमिगत असणार आहे. प्रस्तावित स्थानकाची बाह्य रचना आणि बांधकाम करण्याआधी ड्रोनने सर्वेक्षण केले जाणार आहे.