
Ahmedabad Plane Crash : अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान एआय-171 चा अपघात झाला आहे. या विमानात एकूण 242 प्रवासी अहमदाबादहून लंडनला जात होते. मात्र या अपघातात फक्त एक प्रवासी वगळता इतर सर्वांचाच मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, आता याच विमानात प्रवास करणाऱ्या खुशबू नावाच्या नवविवाहित महिलेची काळीज पिळवटून टाकणारी माहिती समोर येत आहे. लग्नानंतर पाच महिन्यांनी ती तिच्या पतीला भेटायला जात होती. मात्र मध्येच विमान अपघाताच्या रुपात तिच्यावर काळाने घाला घातला.
मिळालेल्या माहितीनुसार अहमदाबादमधील विमान अपघातात खुशबू राजपुरोहित या नवविवाहित तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही तरुणी मूळची राजस्थानमधील बालोतरा जिल्ग्यातील अराबा दुदावता या गावातील रहिवासी होती. लंडनला जाऊन ही तरुणी आपल्या नव्या जीवनाची सुरुवात करणार होती. मात्र त्याआधीच तिचा या विमान अपघातात मृत्यू झाला आहे. लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच ती तिच्या लंडनमध्ये वास्तव्यास असलेल्या पतीकडे चालली होती.
खूशबू राजपुरोहितचा 18 जानेवारी रोजी विपूल सिंह याच्याशी विवाह झाला होता. तिच्या वडिलांचे नाव मदनसिंह राजपुरोहित असे आहे. तिचा पती म्हणजेच विपूलसिंह हा लंडनमध्ये डॉक्टर म्हणून काम करतो. व्हिसा तसेच अन्य पूर्तता झाल्यानंतर आता ती एअर इंडियाच्या विमानाने लंडनला आपल्या पतीकडे जात होती. मात्र मध्येच विमानाचा अपघात झाला आणि तिची स्वपंही या अपघातात उद्ध्वस्त झाली.
खुशबू सध्या तिच्या सासरी म्हणजेच लुणी येथे राहात होती. ती बुधवारी आपल्या गावाहून अहमदाबादला निघाली होती. गुरुवारच्या एअर इंडियाच्या फ्लाईटने ती लंडनला जाणार होती. ठरल्यानुसार ती एअर इंडियाच्या एआय-171 या विमानात बसलीही होती. मात्र हे विमान टेक ऑफ घेतल्यानंतर लगेच मेघाणी नगर येथे कोसळले. यातच तिचा मृत्यू झाला.
दरम्यान, एअर इंडियाच्या या अपघातग्रस्त विमानात एकूण 10 क्रू मेंबर्स होते. आता मृतांची ओळख पटवण्याचे काम चालू आहे. मृतदेहांची डीएनए चाचणी करून ते नातेवाईकांकडे सोपवले जाणार आहेत.