अरविंद केजरीवाल यांना सलग दुसऱ्या दिवशी मोठा झटका; आणखी एका आमदाराचा तडकाफडकी राजीनामा
अरविंद केजरीवाल यांना सलग दुसऱ्या दिवशी मोठा झटका बसला आहे. आता आणखी एका आमदाराने तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

पंजाबमध्ये आम आदमी पक्षात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. सलग दोन दिवसांत तीन आमदारांनी पक्षाची साथ सोडली आहे. अमृतसर उत्तरमधून आमदार कुंवर विजय प्रताप सिंह यांनी पंजाब विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी 1 नोव्हेंबर रोजी विधानसभा अध्यक्षपदाकडे राजीनामा दिला .
कुंवर विजय प्रतापसिंह यांच्याआधी आमदार चेतन सिंह जौरामाजरा आणि आमदार हरमीत सिंह पठानमाजरा यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. कुंवर विजय प्रताप सिंह माजी आयपीएस अधिकारी आहेत. ते पंजाबमध्ये सेवा बजावत होते. त्यांनी 2015 सालच्या एका गोळीबार प्रकरणाच्या तपासात सहभागी होते. या प्रकरणानंतर पुढे त्यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला. कुंवर विजय प्रताप सिंह यांचं भगवंत मान सरकारसोबत मतभेद झाले होते. त्यांच्यावरील मतभेद चव्हाट्यावर देखील येत होते. गोळीबार प्रकरणात न्याय मिळण्यास विलंब होऊ लागल्याने सरकारवर टीका केली होती. विधानसभेच्या एका समितीचा देखील अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
विजय प्रताप सिंह यांनी सरकार आम आदमी पक्षाच्या धोरणावरून भरकटत असल्याा आरोप केला. पंजापमध्ये वाढती गुन्हेगारी, अमली पदार्थांचं सेवन, खंडणी , गुंडगिरीला आळा घालण्यास अपयश आल्याचाही आरोप केला. पक्ष आणि सरकारमध्ये गुंड आणि त्यांच्या कुटुंबीयांचा प्रभाव वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला. 2025 साली विषारी दारू दुर्घटनेतील मृत्यू आणि दारू माफियांचा मुद्दा उपस्थित केला होता. त्याच साली अकाली दलाचे नेते बिक्रम सिंह मजीठिया यांना बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात अटक झाली होती. त्यावेळी कुंवर विजय प्रताप यांनी प्रश्न उपस्थित केले होते. मजीठिया यांच्या वैचारिक मतभेद आहेत. परंतु त्यांच्यावर कारवाई अनैतिक असल्याचा आरोप केला होता. दरम्यान, कुंवर विजय प्रदाप यांनी पक्षविरोधी वक्तव्ये केल्याचे सांगून आम आदमी पक्षाने पाच वर्षांसाठी निलंबित केले आहे. आता थेट त्यांच्या आमदरकीच्या राजीनाम्याने आम आदमी पक्षापुढे नवं संकट उभं ठाकलं आहे. त्यामुळे पक्षापुढील संकट कसं हाताळतात, हे पाहावे लागेल.